देवगड येथील समुद्रात बुडालेल्या विद्यार्थ्यांचा मृत्यू अतिशय दुर्दैवी

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून दुःख व्यक्त
Edited by:
Published on: December 10, 2023 11:49 AM
views 909  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील संकल्प सैनिक अकादमीच्या प्रशिक्षणार्थ्यांचा शनिवारी समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगून या घटनेबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. 

मंत्री श्री. केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडून या घटनेची माहिती घेतली. या घटनेबाबत शोक व्यक्त करून श्री. केसरकर म्हणतात, सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. समुद्र किनाऱ्यांमुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. सिंधुदुर्गसह राज्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर प्रशासनामार्फत पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व प्रकारची दक्षता घेतली जाते. धोकादायक ठिकाणी सतर्कता बाळगण्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या जातात. या सूचनांचे पर्यटकांनी पालन करावे, असे कळकळीचे आवाहन मंत्री श्री.केसरकर यांनी या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा केले आहे. 

जिल्हा प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षिततेची अधिक काळजी घेण्याची सूचना करून मंत्री श्री. केसरकर यांनी या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत.