
कणकवली : फोंडाघाट मृद व जलसंधारण विभागाचे उपविभागीय कार्यालयाकडून सावडाव धरणाचे काम शेतक-यांना जमीन भुसंपादनाचा मोबदला न देताच केवळ संयुक्त मोजणीची नोटीस देत काम सुरु केले. वडीलोपार्जित असलेल्या आम्हा शेतक-यांच्या जमिनीवर दांडगाईने काम चालु ठेकेदाराने केले आहे. प्रकल्पग्रस्त शेतक-यांनी गुरुवारी थेट धरण परिसरात जावून ठेकेदाराला जाब विचारत काम बंद पाडले . त्याच्या मशिनरी , डंपर धरण परिसरातून संतप्त शेतक-यांनी बाहेर काढायला भाग पाडले. या शेतक-यांच्या आंदोलनात शिवसेना उबाठा पक्षाचे तालुकाध्यक्ष कन्हैया पारकर व कार्यकर्त्यांनी सहभाग घेत शेतक-यांच्या भुमिकेला पाठींबा दर्शवला आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सावडाव धरण 2 चे उद्घाटन झाल्यावर एक महिन्यांच्या आत प्रत्येक प्रकल्पग्रस्तास त्यांच्या भूसंपादित जमिनीतील झाडे, बांधकाम, विहीर, जमिनीतील इतर बाबींचा तसेच जमिनीचा किती, कधी व कोणत्या प्रकारे मोबदला मिळणार याबाबत लेखी स्वरूपात पत्र देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्या आश्वासनाची पूर्तता न करताच धरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. ठेकेदाराला हाताशी धरून फोंडाघाट मृद व जलसंधारण विभागाचे अधिकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण व घुसखोरी करून पर स्पर धरणाचे काम करत आहेत. असा आरोप करत सावडाव येथील प्रकल्पग्रस्त शेतक-यांनी धरण परिसरात जावून आंदोलन छेडले.
यावेळी महिला शेतक-यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामध्ये आमचा हक्क मिळालाच पाहिजे ….. जमीन आमच्या हक्काची , नाही कोणाच्या बापाची , स्वाभिमानी शेक-यांचा विजय असो , कोण म्हणतंय देणार नाय … घेतल्याशिवाय राहणार नाय अशा जोरदार घोषणा प्रकल्पग्रस्तांनी दिल्या.
आमचा धरणाला विरोध नाही – प्रकल्पग्रस्त शेतकरी
शेतक-यांना किती आणि केव्हा मोबदला मिळणार याबाबत कोणतीही माहिती शासनाकडून देण्यात आलेली नाही. केवळ संयुक्त मोजणी करण्याबाबत नोटीसा शेतक-यांना देण्यात आल्या . मात्र येथील नुकसान भरपाई काय मिळणार कोणत्या स्वरुपात मिळणार ? याबाबत स्पष्ठ लेखी दिलेले नाही. ठेकेदाराला हाताशी धरुन अधिका-यांनी शेतक-यांची फसवणूक केली असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला.
शिवसेना उबाठा पक्ष शेतक-यांच्या पाठीशी राहणार – कन्हैया पारकर
यावेळी शिवसेना उबाठा पक्षाकडून या शेतक-यांच्या भुमिकेला पाठींबा देण्यात आला. आमचा धरणाला विरोध नसून मुळ शेतक-यांच्या मागण्या शासनाने पुर्ण कराव्यात . आणि जमीनीचा मोबदला शेतक-यांना न देता जमीनीमध्ये धरणाचे जे काम चालु आहे. ते चुकीच्या पध्दतीने चालु आहे. त्याचे मुल्यांकन न करताच झाडे व जमीन उध्वस्त करण्याचे काम केल जात आहे. पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे व खा. विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शेतक-यांना न्याय देण्यासाठी पुढील काळात आम्ही शेवटपर्यंत राहणार आहोत . अधिकारी आणि ठेकेदाराने धरणाचे काम करत शेतक-यांची फसवणूक केली. केवळ या ठेकेदारीतून पैसे खाण्यासाठी केलेला आहे. जो पर्यंत शेतक-यांचे समाधान होत नाय तो पर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांनी दिला . यावेळी शिवसेना महिला आघाडी प्रमुख निलम पालव सावंत , राजु राठोड , दिव्या साळगांवकर , माधवी दळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते . तर सावडाव धरण प्रकल्पग्रस्त शेतक-यांमध्ये वैभव सावंत, नयना सावंत, विष्णू झगडे, आनंद नरसाळे, विद्याधर वारंग, संभाजी तेली, बाळकृष्ण चव्हाण, संदीप खांदारे, सतीश मोरे आदी उपस्थित होते.