
सावंतवाडी : जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर कोलगाव ते आकेरी दरम्यान ठेकेदाराच्या कृपेने खडड्यांची माळच गुंफली गेली आहे. आता तर पडलेल्या खडड्यात चिरे टाकून थूक लावण्याचा प्रकार झालाय. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून डांबर गेलं कुणीकडे ? असं विचारायची वेळ प्रवाशांवर आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केलेले हे रस्ते वर्ष दोन वर्ष सुद्धा टिकत नाहीत. त्यामुळे रस्त्यासाठीच असणार डांबर खातय कोण ? हा प्रश्न निर्माण होत आहे. जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव व कुडाळ तालुक्यातील आकेरी हद्दीपर्यंत खडड्याची डोकेदुखी सतावत आहे. येथून प्रवास करणाऱ्यांना ऑफ रोडींगचा अनुभवच जणू सार्वजनिक बांधकाम विभाग अन् ठेकेदाराच्या कृपेने मिळतोय, तोही अगदी मोफत. त्यामुळे शिव्यांच्या रूपानं प्रवासी याची परतफेडही करत आहेत. त्यातला थोडा वाटा लोकप्रतिनिधींच्याही नशीबी येत आहे.
एकंदरीतच, ही परिस्थिती बघता मोठ्या दुर्घटना घडता नये यासाठी लोकप्रतिनिधींनी तातडीने उपाययोजना करण आवश्यक आहे. तशी मागणी देखील प्रवाशांकडून होत आहे.