तिलारी घाटाच्या तीव्र उताराच्या वळणावर कंटेनर अडकला

Edited by: लवू परब
Published on: September 30, 2024 11:09 AM
views 83  views

दोडामार्ग : तिलारी घाटातून गोव्याच्या दिशेने जात असताना तिलारी घाटाच्या तीव्र उताराच्या वळणावर एक कंटेनर अडकल्याची घटना रविवारी रात्रौच्या सुमारास घडली. तेथील रस्त्याचा पूर्ण भाग कंटेनरने व्यापल्याने वाहतूक ठप्प झाली. परिणामी इतर वाहन चालकास त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. घाटातून अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी घालताना सार्वजनिक बांधकाम उपविभाग, पोलीस व आरटीओ विभागास कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असताना हा कंटेनर घाटात आलाच कसा ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

 तिलारी घाट हा तीव्र उतार व यु आकाराच्या वळणाचा असून घाटातील रस्ता अरुंद आहे. परिणामी घाटात लांब व मोठ्या आकाराची अवजड वाहने अडकून अनेक अपघात घडले आहेत. त्यामुळे वाहतूकही पूर्णता ठप्प होऊन इतरांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या घाटात अवजड वाहनांमुळे होणारे वाढते अपघात लक्षात घेता हा घाट २० जून ते ३१ ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीस बंद ठेवण्याचे आदेश कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी पारित केला आहे. शिवाय याबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम उपविभाग, पोलीस आणि आरटीओ विभाग यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेशात नमूद केले आहे. असे असताना देखील घाटातून अवजड वाहतूक अद्यापही चालू असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे.

 रविवारी रात्रीच्या सुमारास घाटमाथ्यावरून गोव्याच्या दिशेने जाण्यासाठी एक कंटेनर तिलारी घाट उतरत होता. मात्र घाटाच्या पूर्वार्धातच असलेल्या तीव्र उताराच्या व यु आकाराच्या वळणाचा चालकास अंदाज चुकला आणि चालकाच्या प्रसंगावधानामुळे कंटेनर दरीत कोसळण्यापासून बचावला. यावेळी चालकाने कंटेनर मागे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यात चालक सपशेल अपयशी ठरला व कंटेनर तेथेच उभा राहिला. त्यामुळे तेथील रस्त्याचा संपूर्ण भाग कंटेनरने व्यापल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला. दुचाकी व्यतिरिक्त इतर वाहने रस्त्याच्या दुतर्फा अडकून पडली. अनेक वाहनचालक व प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. घाटातून अवजड वाहनांना बंदी आदेश असतानाही हा कंटेनर घाटात आलाच कसा? असा सवाल यावेळी उपस्थित प्रवासी व वाहन चालकातून होत आहे.