
सावंतवाडी : सावंतवाडी जिमखाना मैदानाची परिस्थिती फारच दयनीय आहे. त्यामध्ये तातडीने सुधारणा करून क्रिकेट खेळण्यासाठी उपलब्ध करून द्या,अन्यथा नगरपरिषदेवर सावंतवाडी शहरातील सर्व क्रिकेट प्रेमी व युवा खेळाडूंसह मोर्चा काढणार असा इशारा माजी आरोग्य व क्रीडा सभापती तथा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड.परिमल नाईक यांनी दिला आहे.
ते पुढे म्हणाले,सावंतवाडी शहरातील जिमखाना मैदान हॆ ऐतिहासिक मैदान असून या मैदानाने असंख्य क्रिकेटपटू घडवले. जगप्रसिद्ध व क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकरसह विनोद कांबळी, प्रवीण आमरे,समीर दिघे यांच्या सारखे नामांकित खेळाडूंनी या मैदानावर कै. द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे प्राथमिक धडे घेतले. भारताच्या टीममधील अनेक नामवंत खेळाडू या मैदानावर खेळून गेले. सावंतवाडी व परिसरातील अनेक टॅलेंटेड क्रिकेटपटू या मैदानावर सरावासाठी इच्छुक असून ते प्रतीक्षेत आहेत.सरावासाठी व मॅचेस साठी इतरत्रमैदान उपलब्ध सुद्धा नाही.
डिसेंबर महिना संपत आला तरी मैदानाची परिस्थिती अतिशय गंभीर असून वेळोवेळी विनंती वजा मागणी करून सुद्धा परिस्थिती “जैसे थे ”आहे. प्रशासनाची अनास्था, बेजबाबदारपणा व असंवेदनशीलता ही अतिशय चिंताजनक आहेत. मैदानावर देखभाली करिता लाखो रुपये खर्च केले जातात व त्या खर्चाचा प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष रित्या सहजासहजी अपव्यय होत असून जनतेच्या पैशाची पायमल्ली करण्यासारखा हा प्रकार आहे. नगरपरिषद प्रसासन खाजगी कार्यक्रमांना जिमखाना मैदान भाडयाने देऊन सुद्धा मैदानाची अवस्था बिकट करत असते. प्रशासनाने भविष्यात खाजगी प्रयोजनासाठी मैदान भाड्याने देऊन दुरावस्था केल्यास व येत्या पंधरा दिवसात जिमखाना मैदान सुस्थितीत उपलब्ध करून न दिल्यास शहरातील सर्व क्रिकेट प्रेमीसह युवावर्ग यांच्या समवेत नगरपरिषदेवर नागरी मोर्चा काढण्यात येईल असा इशारा क्रीडा प्रेमी तथा माजी आरोग्य व क्रीडा सभापती अँड. परिमल नाईक यांनी दिला आहे.