कुडाळ शहराला अमली पदार्थाचा विळखा..?

नागरिकांची कुडाळ पोलीस ठाण्यात धाव
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 30, 2023 18:51 PM
views 335  views

कुडाळ : कुडाळ शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री होत आहे आणि यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. त्यामुळे कुडाळ शहरातील अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचा शोध घेत कारवाई करा अन्यथा जागरुक नागरिक म्हणून आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल त्याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा इशारा कुडाळ वासियांना दिला आहे. या मागणीचे निवेदन कुडाळ शहर नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक रुणाल मुल्ला यांना दिला आहे.

कुडाळ शहरात गांजा चरस कोकेन सारख्या अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने कुडाळ शहरासह गावातील युवक व्यसनाधीन झाले आहेत याबाबत आज कुडाळ शहरातील नागरिकांनी मारुती मंदिर धर्मशाळेत बैठक घेतली. यावेळी सर्वानुमते सर्वांनी पोलिसांना अवैध गांजा चरस कोकण विक्री बाबत निवेदन देऊन कारवाईची मागणी करावी असा ठराव घेण्यात आला. त्यानुसार कुडाळ शहरातील नागरिकांनी कुडाळ पोलीस निरीक्षक रूणाल मुल्ला यांची भेट घेत निवेदन सादर केले या निवेदनात असे म्हटले आहे की, शहरासह कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री होत आहे आणि यामध्ये तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे.

अमली पदार्थाच्या सेवनाने शरीराची ही हानी होत आहे, अमली पदार्थाच्या किमतीही मोठ्या प्रमाणात असल्याने आर्थिक चंचन भासल्यास युवक गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता आहे. भविष्यात मोठ्या शहरां प्रमाणे अमली पदार्थ सेवनामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढणार आहे. युवक हा देश घडविणारा एक घटक आहे हा घटकच व्यसनाधीन झाला तर देश देशोधडीला जायला वेळ लागणार नाही . त्यामुळे शहरासह तालुक्यातील अमली पदार्थ विक्रीचे अड्डे लवकरात लवकर बंद व्हावेत अन्यथा जागरूक नागरिक म्हणून सर्व अमली पदार्थांचे अड्डे बंद करावे लागतील व त्यावेळी होणाऱ्या संघर्षास पोलीस खाते जबाबदार राहील याची दक्षता घ्यावी असेही या निवेदनात म्हटले आहे.