
दोडामार्ग : तिलारी घाटातील दाट धुक्यांचा अंदाज न आल्याने एक आलिशान कार संरक्षक कठड्यावर चढून अपघात झाला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसून ती दरीत कोसळण्यापासून बालंबाल बचावली. रविवारी मध्यरात्री १ वा.च्या सुमारास अपघात झाला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.
गोव्यातील काहीजण हे त्यांच्या आलिशान असलेल्या ऑडी कारने रविवारी मध्यरात्री तिलारी घाट उतरत होते. दरम्यान, पावसामुळे घाटात दाट धुक्याची चादर पसरली होती. या धुक्यामुळे कार चालकास घाटातील अवघड वळणाचा अंदाज चुकला व कार थेट संरक्षक कठड्यावर चढली. कारचा मध्यभाग कठड्यावर व चाके अधांतरीच राहिल्याने कार तेथेच स्थिरावली व केवळ दैव बलवत्तर म्हणून दरीत कोसळण्यापासून बचावली. या अपघातात कोणीही जखमी झाले नसून आलिशान कारचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.