
शिक्षणाधिकार्यांनी काढले परिपत्रक
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील अनुदानित शाळांमध्ये वह्या विक्रीच्या सुरू असलेल्या व्यापारासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य विक्री व्यावसायिक संघटनेने पालकमंत्री नीतेश राणे यांना पत्र पाठवून तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत पालकमंत्री राणे यांनी तत्काळ शिक्षण विभागाला कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी यासंदर्भात शाळांना परिपत्रक जारी करून शासनाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आणि वह्या विक्रीचा प्रकार थांबविण्याचे आदेश दिले आहेत. या कार्यवाहीमुळे संघटनेने समाधान व्यक्त केले असून, पालकमंत्री राणे यांचे आभार मानले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नामांकित अनुदानित शाळांमधून विद्यार्थ्यांसाठी वह्या विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची तक्रार साहित्य विक्री व्यावसायिक संघटनेने पालकमंत्री राणे यांच्याकडे केली होती. याबाबत संघटनेने पत्राद्वारे आपली कैफियत मांडली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष शैलेश केसरकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष नित्यानंद कोरगांवकर, सचिन कुडतरकर, शेखर पेडणेकर, वेंगुर्ले येथील श्री. तांडेल आदी पुस्तके व स्टेशनरी विक्रेते उपस्थित होते.
यावर तातडीने कार्यवाही करत पालकमंत्री राणे यांनी शिक्षण विभागाला या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती पावले उचलण्याचे आदेश दिले. त्यानुसार शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कविता शिंपी यांनी ११ जून २००४ च्या शासन निर्णयाचा संदर्भ देत सर्व शाळांना याबाबत स्पष्ट निर्देश दिले. या शासन निर्णयानुसार, शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश किंवा अन्य शैक्षणिक साहित्य शाळेच्या भांडारातून किंवा व्यवस्थापनाने ठरवून दिलेल्या विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती पालकांवर किंवा विद्यार्थ्यांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या करता येणार नाही. तसेच शिक्षण सेवेत कार्यरत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला इतर व्यवसाय करण्याची परवानगी नसून, अशा प्रकारच्या व्यावसायिक व्यवहारांवर शासनाने बंधने घातली आहेत. नियमांचे काटेकोरपणे पालन न केल्यास संबंधित शाळेच्या प्रशासनावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही शिक्षणाधिकारी शिंपी यांनी जारी केलेल्या परिपत्रकात दिला आहे. पालकमंत्री राणे यांनी या प्रकरणात दाखविलेल्या तत्परतेमुळे संघटनेने समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहेत.