
कुडाळ : कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभाकर प्रभू म्हणजे सुशासन, धोरण आणि लोकाभिमुखता यांचा त्रिवेणी संगमच. भारताच्या या अत्यंत विद्वान पण तितक्याच साध्या व्यक्तिमत्त्वाच्या जीवन प्रवासावर आधारित ऍड. नकुल पार्सेकर यांनी 'ध्येयधुंद' हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंती दिवशी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी पार्क-मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. याविषयी आज लेखक ऍड. नकुल पार्सेकर यांनी माहिती दिली. कुडाळ एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर आणि कॉनबॅकचे संचालक संजीव कर्पे उपस्थित होते.
माजी केंद्रीय मंत्री आणि अनेक मोठ्या पदांवर काम केलेले कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभू यांचा जीवन प्रवास त्यांच्या सोबत २५ वर्ष राहिलेल्या ऍड. नकुल पार्सेकर यांनी ध्येयधुंद या पुस्तकातून शब्दबद्ध केला आहे. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई-शिवाजीपार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात सकाळी ११ वाजता या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार आहे. त्या प्रकाशन सोहळ्याला भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, विख्यात वास्तूविशारद शशी प्रभू, एबीपी माझाचे कार्यकारी संपादक राजीव खांडेकर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नाबार्डचे संचालक सतीश मराठे, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, अर्थतज्ञ तथा कालनिर्णयचे व्यवस्थापकीय संचालक जयराज साळगावकर, ज्येष्ठ सनदी लेखापाल तथा एसबीआयचे माजी संचालक प्रफुल्ल छाजेड, प्रकाशक स्वामीराज प्रकाशनचे रजनीश राणे आणि श्री वर्धमान श्रुतरंगा ट्रस्टचे साहाय्य शाह आदी मान्यवर उपथित राहणार आहेत.
ऍड. नकुल पार्सेकर म्हणाले, देशात अनेक नेते होऊन गेले. पण सुरेश प्रभू यांनी देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा उपयोग करून स्वतःची एका वेगळी प्रतिमा निर्माण केलेली आहे. आजची राजकीय परिस्थती पाहता युवकांच्या मनात एक सकारत्मक विचार निर्माण व्हावा, सुरेश प्रभू म्हणजे काय हे त्यांना समजावे या उद्देशाने या पुस्तकांचे लेखन केले आहे. २५ वर्ष त्यांच्या सोबत राहिलेला मी कार्यकर्ता असून त्यांच्या सोबत घेतलेल्या अनुभूतीवर आधारित हे पुस्तक आहे. ध्येयधुंद हे पुस्तकाचे शीर्षक सुरेश प्रभू यांच्या कार्याला साजेसे आहे, अशा प्रतिक्रिया अनेक नामवंतांनी दिल्याचे ऍड. पार्सेकर यांनी सांगितले.
ऍड. नकुल पार्सेकर या पुस्तकाबद्दल सांगताना म्हणाले, या पुस्तकात एकूण २० प्रकरणे आहेत. .त्यात सुरेश प्रभू यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, बालपण, शिक्षण, उच्च शिक्षण, व्यवसाय, राजकारणातील प्रवेश, केंद्रीय मंत्रीपदे, त्यांनी भूषविलेले विविध पदे, त्यांचे कौटुंबिक जीवन, अंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी उमटवलेला ठसा, मंत्री नसताना अमित शहा यांनी सोपवलेली राष्ट्रीय सहकार धोरणाची जबाबदारी, सहधर्माचरणी, त्यांचा मुलगा, त्यांचे गुरु याविषयी देखील पुस्तकात माहिती आहे. ऍड. नकुल पार्सेकर यांना सुरेश प्रभू यांच्या विषयीच्या आलेल्या अनुभूतीचा उल्लेख देखील स्वतंत्र प्रकरणात करण्यात आलेला आहे. बांबू चळवळीचे जंक या प्रकरणात बांबू चळवळीची वाटचाल शब्दबद्ध करण्यात आली आहे.
ऍड. नकुल पार्सेकर यांनी लिहिलेल्या ध्येयधुंद या पुस्तकाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शरद पवार, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांची प्रस्तावना असून पदमश्री मधू मंगेश कर्णिक, पत्रकार राजीव खांडेकर यांनी पुस्तकाला शुभेच्छा दिल्या आहेत. या पुस्तकाच्या स्वागत समितीमध्ये ऍड. नकुल पार्सेकर यांच्यासह मोहन होडावडेकर, संजीव कर्पे, विजय केनवडेकर, योगेश प्रभू, रवींद्र वाडेकर, प्रतीक मेश्राम, श्रीकांत भालेराव आणि डॉ. अमेय देसाई आहेत. मुंबईत १९ फेब्रुवारीला होणाऱ्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन लेखक ऍड. नकुल पार्सेकर यांनी केले आहे.










