'त्या' चिमुरडीचा मृतदेह मिळाला

डंपर चालकाला ताब्यात घेतलं जाणार
Edited by: विनायक गांवस
Published on: August 23, 2024 12:05 PM
views 2971  views

सावंतवाडी : मळेवाड कोंडुरे भागातील चिरेखाणीत डंपर अपघातात मृत्यू पावलेल्या लहान मुलीच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज सकाळपासून सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू होते. दुपारी हा मृतदेह सुमारे पाच ते सहा फूट खोल अंतरावर आढळून आला. हा मृतदेह शवाविच्छेदनासाठी सिंधुदुर्ग ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक  चव्हाण यांनी दिली.

मळेवाड येथील एका चिरेखाणित एका तीन वर्षीय बालिकेचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला होता. त्यानंतर याबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही कल्पना न देता बालिकेचा मृतदेह परस्पर दफन करण्यात आला होता. याबाबतची चर्चा सुरू झाल्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत गुरुवारी 

घटनास्थळाची पाहणी केली होती. त्यानंतर स्थानिक पोलीस पाटलांनी सावंतवाडी पोलिसात सदर प्रकरणाची फिर्याद नोंदविल्यानंतर अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज सकाळी  सावंतवाडी पोलिसांचे तसेच महसूल विभागाचे पथक घटनास्थळी पुन्हा एकदा दाखल होत मृतदेहाचा शोध सुरू करण्यात आला होता. यावेळी त्या मृत मुलीचे वडिल घटनास्थळावर उपस्थित होते. त्यांनी दाखवलेल्या जागेत खुदाई करून शोध घेतला असता दुपारी साधारणपणे एकच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला. यावेळी घटनास्थळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, नायब तहसीलदार मनोज मुसळे, वैद्यकीय अधिकारी, पोलीस पाटील दिगंबर मसुरकर, त्याचबरोबर दोन महिला पंच व अपघातात मृत्यू पावलेल्या मुलीचे वडील घटनास्थळी उपस्थित होते. संबंधित मुलीचा मृतदेह सापडल्यामुळे प्रकरणाची सत्यता उलगडली असून आता संबंधित डंपर चालकाला ताब्यात घेतले जाणार असून याप्रकरणी कोण कोण दोषी आहेत त्यांचा देखील शोध घेतला जाणार आहे. या घटनेनंतर मृत मुलीचे वडिल छत्तीसगड येथे गेले होते. ते परतले असून त्यांचीही चौकशी होणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.