
वेंगुर्ले : तालुक्यातील रेडी घंगाळेश्वर देवस्थानच्या बाजूला असलेल्या रेडी पोर्ट ऑफिसच्या मागील बाजूला समुद्रातील खडकामध्ये एक अनोळखी ३० वर्षीय महिले चा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी आढळून आला आहे. आकस्मित मृत्यू म्हणून पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी याच समुद्रकिनारी एका अनोळखी ४० वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. दरम्यान या दोन्ही व्यक्तींचा एकमेकांशी काही संबंध आहे का किंवा दोघांच्या मृत्यू मागील कारण काय याची चौकशी वेंगुर्ले पोलीस करत आहेत.
रेडी सुकळभाटवाडी येथील सिताराम सगुण राणे यांनी रेडी पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये असे म्हटले आहे की, रेडी समुद्रातील खडकामध्ये हा अनोळखी महिलेचा मृतदेह दिसून आला. तिची ओळख समजून येत नाही. त्या माहितीवरून वेंगुर्ले पोलिसांनी शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता याबाबत आकस्मिक मृत्यू ची नोंद केली आहे. रेडी येथे महिलेचा मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच डीएसपी श्री. कांबळे, वेंगुर्ले पोलीस निरीक्षक संदीप भोसले, पीएसआय तुकाराम जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवाग्रहात ठेवण्यात आला आहे. या महिलेबाबत कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्याची संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणी अधिक तपास पीएसआय तुकाराम जाधव करीत आहेत.