
नवी मुंबई : गुडीपाढव्याच्या मुहूर्तावर नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. दरवर्षी पेक्षा या वर्षी गुडीपाढव्याला होणारी आवक जास्त असल्याने आंब्याचे दर सुद्धा खाली आले आहेत.
सध्या दिवसाला 60 ते 65 हजार हापूस आंब्याच्या पेट्या एपीएमसी मार्केटमध्ये येत आहेत. यामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून साधारण 45 हजार हापूस पेटी येत असून 15 ते 20 हजार पेट्या कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशमधून दाखल होत आहेत.
आंबा जास्त येऊ लागला असल्याने दर सुद्धा सध्या कमी झालेले आहेत. पिकलेला हापूस आंबा 600 ते 1600 रुपये डझन विकला जात असून हिरवा आंबा 400 ते 1 हजार रुपयाने विकला जात आहे. दरम्यान राज्यात तीन ते चार दिवस अवकाळी पाऊस पडत असला तरी कोकणात तो पडला नसल्याने आंब्यावर याचा परिणाम झालेला नाही. या वर्षी मार्च महिन्यात मोठी आवक असली तरी एप्रिलमध्ये हापूस आंब्याची आवक कमी राहिल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केल्यास हजारो हेक्टरवर आंबा बागा असून त्यातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातून गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत आंबा बागायतदार आपल्या हापूस व्यवसायाची सुरुवात करतात. मोठ्या प्रमाणात पेट्या बाजारात दाखल होतात. सर्वसामान्यांपासून प्रत्येक जण यावेळी आंबा खरेदी करतो. यंदा कोकणातून गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला नवी मुंबईतील वाशी मार्केटमध्ये जाणाऱ्या पेट्यांची संख्या वाढली आहे. शिवाय इतर राज्यातील आंबाही दाखल झाला आहे. त्यामुळे आंब्याचे दर सुद्धा कमी झाल्याने ग्राहकांना मनमुरादपणे आंबा खाता येणार आहे.