खरेदी-विक्री संघांच्या निवडणूक प्रक्रियेतील अपील फेटाळले !

कोळमेकर यांच्या वतीने अॅड परिमल नाईक यांचा युक्तीवाद
Edited by: विनायक गांवस
Published on: November 01, 2022 12:56 PM
views 419  views

सावंतवाडी : खरेदी-विक्री संघ सावंतवाडी निवडणुक प्रक्रियेतील उमेदवार गंगाराम राजाराम शेळके (रा. धनगरवाडी, धाकोर, ता. सावंतवाडी ) यांनी सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. सावंतवाडी या संस्थेच्या सन २०२२-२३ ते २०२७-२८ या पंचवार्षिक निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. या उमेदवाराचा अर्ज छाननीमध्ये फेटाळलेला असल्याने त्यांनी ओरोस येथिल जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे न्यायालयात अपील दाखल केले होते. गंगाराम राजाराम शेळके यांनी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा त्यास दुसरे उमेदवार दत्ताराम राघोबा कोळमेकर यांनी १७ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या छाननी प्रक्रियेदरम्यान अपीलार्थी गंगाराम राजाराम शेळके यांचे नाव जाहीर झालेल्या संस्थेच्या अंतीम मतदार यादीमध्ये नाव नसताना अपीलार्थी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे असा आक्षेप घेतला होता. त्यावरून अपीलार्थी यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आलेला होता. त्याविरूद्ध त्यांनी अपील दाखल केलेले होते.

उत्तरार्थी दत्ताराम राघोबा कोळमेकर यांच्या वतीने अॅड परिमल गजानन नाईक यांनी युक्तीवाद करताना अपेलेंट यांचे नाव तसेच त्यांचे सुचक व अनुमोदक यांचे नाव संस्थेच्या अंतीम मतदार यादीत नाही त्याचप्रमाणे त्यांच्या नामनिदेर्शन पत्रावर ज्या प्रवर्गातून निवडणुक लढवत आहे त्याचा सुद्धा उल्लेख नाही व त्यांचे नाव मतदार यादीत रितसर नमुद नाही. तसेच छाननीच्या वेळी आवश्यक तो लेखी पुरावा अपेलेंट यांनी सादर केला नाही. परिणामी नामनिर्देशन पत्र परिपुर्ण स्वरूपाचे नाही. तसेच अपीलात नमुद केलेले मुद्दे, सहकार अधिनियम १९६० अथवा महा. सहकारी संस्था, समीती निवडणुक अधिनियम २०१४ च्या कक्षेत बसत नाहीत. त्यामुळे निवडणुक अधिकारी यांनी योग्य व रास्त रित्या अपेलेंट यांचा उमेदवारी अर्ज छाननीच्या वेळी बाद ठरविला इत्यादी मुद्दयांच्या आधारे युक्तीवाद करत बाजु मांडली.