
देवगड : देवगड मुणगे येथील नवसाला पावणारी व हाकेला धावणारी असा महिमा असणाऱ्या श्री देवी भगवती चा वार्षिक यात्रोत्सव भाविकांच्या गर्दीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा जत्रोत्सव पौष पौर्णिमेस चालू होतो व पाच दिवस चालतो.
देवगड मुणगे येथील श्री देवी भगवती चा वार्षिक जत्रोत्सव दिनांक २५ जानेवारी पासुन २९ जानेवारी २०२४ पर्यंत या कालावधीत संपन्न झाला. दूरवरच्या गावातील भाविक देवीच्या दर्शनासाठी, नवस करण्या साठी - फेडण्यासाठी आणि ओटी भरण्यासाठी आले होते . या वेळी मंदिर परिसरात देवीच्या दर्शना साठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भाविकांच्या लांबच लांब रांगा दर्शनासाठी लागलेल्या दिसून येत होत्या. वार्षिक यात्रोत्सवात देवीची पूजा-अर्चा, दर्शन, ओट्या भरणे, नवस बोलणे व नवस फेडणे, सायंकाळी गोंधळी गायन, संगीत भजने, प्रवचन व पुराणवाचन, देवीची आरती, पालखी मिरवणूक आणि किर्तन असे कार्यक्रम आयोजित केले होते. यात्रेच्या शेवटच्या रात्री ‘लळीता’च्या कार्यक्रमाने या शानदार सोहळ्याची सांगता केली गेली. मुंबईकर, माहेरवाशिणी बहुसंख्येने उपस्थित राहून देवीचे आशिर्वाद या वेळी घेतले.या वेळी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.मंदिर परिसर अतिशय सुंदर अश्या विद्युत रोषणाईने सजवला गेला होता. दूरवरच्या भाविकांची मंदिराच्या शेजारीच असलेल्या भक्तनिवासात राहण्याची सोय केली गेली होती. देवीचा डाळपस्वारीचा सोहळासुद्धा यावेळी अविस्मरणीय होता.
देवगड मुणगे येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री देवी भगवती चा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या गावची ग्रामदेवता देवी भगवती हे एक जागृत देवस्थान आहे. देवी भगवतीचा वरदहस्त या गावावर असल्याने मुणगे हे गाव प्रसिद्धीस आले आहे.अगदी सागरी महामार्गाला लागूनच देवी भगवतीचे प्राचीन कौलारु देवालय आहे. देवीच्या सध्याची पाषाणमूर्तीची १८१० मध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली. काळ्या पाषाणात सुंदर रेखीव कोरीव काम केलेली महिषासूर मर्दीनीच्या रूपात ४ फूट उंचीची मूर्ती असून बाजूला चांदीच्या पत्र्याचा सुंदर नक्षीकाम केलेला महिरप आहे. मूर्तीच्या एका हातात खड्ग, दुस-या हातात त्रिशुल, तिस-या हातात ढाल व चौथ्या हातात शंख असून ती महिषासूरावर पाय ठेवून उभी आहे. गाभा-यात मूर्ती उंचावर असल्याने बाहेरूनही भाविकांना दर्शन घेता येते.
मंदिराच्या गाभा-यात एक शिवलिंग व गाभा-याबाहेर संकेताचा पाषाण आहे. देवीची आज्ञा घेतेवेळी त्यात पाषाणाचा उपयोग केला जातो. त्या पाषाणात देवतेचा अंश असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. तो पाषाण दहा किलो वजनाचा असून त्याास 'गुंडी' असे म्हटले जाते. सोलापूर परिसरात तशा पाषाणाला 'गुंडा' असे संबोधन आहे. त्या पाषाणाच्या साह्याने देवीच्या मंदिरात कौलप्रसाद घेण्याचे काम तसेच न्यायनिवाडे करण्याचे काम नित्यनियमाने सुरू असतात. उत्सव काळात देवीचं स्नान झाल्यावर सकाळी देवीस वस्रलंकारांनी व कवडय़ाच्या माळेनं सजववल्यावर विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर देवीचं दर्शन व ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो. उत्तरेला असलेल्या गोमुख व शिवस्थानामुळे या देवीला ‘सोमसुत्री’ प्रदक्षिणा घालावा लागते. देवीची पालखीही तशीच फिरवली जाते.