
सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी तालुक्यात रोणापाल येथे जंगलात आढळून आलेल्या परदेशी महिलेला बुधवारी रात्री उशिरा सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या परदेशी महिलेवर गोवा बांबोळी येथे उपचार केल्यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे पुढील उपचारासाठी या महिलेस जिल्हा रुग्णालयात बुधवारी रात्री उशिरा आणण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील डॉक्टरांनी पाहणी केली असून, पुढील निर्णय पोलीस व आरोग्य यंत्रणा घेणार आहे.
ही परदेशी महिला शुक्रवारी सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल येथील जंगलात साखळ दंडाने बांधलेल्या अवस्थेत गुराख्याला आढळून आली होती. या महिलेची प्रकृती स्थिर असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथे या महिलेवर उपचार सुरू आहेत. या महिलेच्या सुरक्षेतेसाठी स्थानिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
फोटो घेण्यास मनाई !
या महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथे वॉर्ड ई मध्ये ठेवण्यात आले आहे, तर या वॉर्ड मध्ये विशेष सूचनाफलक लावण्यात आला असून फोटोग्राफी व व्हिडिओग्राफीसाठी मनाई करण्यात आली आहे.