
वेंगुर्ले : गेली ३-४ महिन्यांत वीज स्मार्ट मीटरची बिले भरमसाठ दुप्पट-तिप्पट येत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच नागरिकांकडून या वाढीव भरमसाट वीज बिलाची वसुलीही केली जात आहे. यामुळे हे सर्व त्वरित थांबवून जून्याच मिटर प्रमाणे आकारण्यात यावीत व स्मार्ट मीटर काढून पूर्वीचे मीटर बसविण्यात यावेत. तसेच विज स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना झालेला अतिरिक्त आर्थिक भुर्दंड विद्युत वितरण कंपनीने उचलावा अशी मागणी सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटनेच्या वतीने करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना वेंगुर्ला यांच्यावतीने स्मार्ट वीज मीटरमूळे येणाऱ्या भरमसाट वीज बिलांच्या विरोधात वेंगुर्ला विद्युत वितरण कार्यालयाला धडक देण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, तालुकाध्यक्ष संजय गावडे, सचिव जयराम वायंगणकर, किरण खानोलकर, डॉ संजीव लिंगवत यांच्यासहित श्रीकृष्ण गावकर, कृष्णा मातोंडकर, किशोर तेरसे, शेखर परब, दत्ता धुरी, पांडुरंग मिसाळ, सतेज कुर्ले, लुईस डिसोजा, इम्तियाज मकानदार, वामन कुबल, श्री. तेरेखोलकर, प्रसाद मराठे आदी विविध भागातील नागरिक उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी कडून स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. याविरोधात गेली २ वर्षे वेळोवेळी विरोध दर्शवून निवेदने देण्यात आली आहेत. यावेळी हे स्मार्ट मीटर न बसविण्याचे आश्वासन अधीक्षक अभियंता यांनी वीज ग्राहक संघटना व विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिलेले आहे. असे असताना बऱ्याच ग्राहकांच्या संमतीशिवाय त्यांच्या गैरहजरीत, दंडगाईने हे मीटर बसविण्याचे काम सुरूच आहे. गेली तीन ते चार महिने या स्मार्ट मीटरची बिले भरमसाठ व दुप्पट तिप्पट येत असल्याचे निदर्शनास आले आहे.
स्मार्ट मीटर विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात आगडोंब उसळत असून आपल्या कार्यालयाकडून या वाढीव भरमसाठ विज बिलाची वसुली केली जात आहे. हे त्वरीत थांबवून विज बिले जून्याच मिटर प्रमाणे आकारण्यात यावीत व स्मार्ट मीटर काढून पूर्वीचे मिटर बसविण्यात यावेत. तसेच वेंगुर्ला डिव्हिजन मध्ये १४५४ ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर लावण्यात आलेले आहेत ते सर्व काढून जुने मीटर बसविण्यात यावेत व या स्मार्ट मीटर मुळे नागरिकांना झालेला आर्थिक भुर्दंड वीज मंडळाने उचलावा अशी मागाणी विज ग्राहक संघटनेच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी यापुढे स्मार्ट मीटर रिप्लेसमेंटसाठी वापरण्यात येणार नाहीत. खराब झालेले मीटर हे स्मार्ट मीटरद्वारे बदलण्यात येऊ नये. याबाबत कार्यकारी अभियंता यांच्याकडून एजन्सी ला योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. जे मीटर स्मार्ट मीटर द्वारे बदलण्यात आलेले आहेत. त्याबाबत ज्या मीटरची तक्रार आहे त्या मीटर बाबत तपासणी करून पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. तसेच जे मीटर स्मार्ट मीटर द्वारे आतापर्यंत बसवलेले आहेत ते सर्व मीटर पूर्वीप्रमाणे बसवण्याबाबत वरिष्ठ कार्यालयास पाठपुरावा करण्यात येईल असे लेखी आश्वासन आश्वासन वेंगुर्ला वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता यांच्याकडून देण्यात आले.