
कुडाळ : आ. वैभव नाईक यांनी मठ कुडाळ पणदूर घोटगे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर याच कामाचा पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते दि. ६ जानेवारी रोजी दुपारी ३:०० वाजता डिगस येथे श्री देवी कालिका मंदिर नजीक शुभारंभ केला जाणार आहे.
या कामाच्या भूमिपूजनासाठी शासनाच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, लोकसभा सदस्य खासदार विनायक राऊत, विधानसभा सदस्य आमदार आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, तसेच विधान परिषद सदस्य आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे असे निमंत्रण पत्रिकेत म्हटले आहे.
मठ कुडाळ पणदूर घोडगे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते डिगस येथे पार पडला होता, याच दरम्यान भाजप कार्यकर्ते विरुद्ध ठाकरे सेना यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. व त्यानंतर उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी भाजप कार्यकर्त्यांचा निषेध करण्यात आला होता, तर आमदार वैभव नाईक यांनी सत्ता बदलानंतर जे आमदार सत्तेत सहभागी झाले नाहीत, अशा आमदारांची कामे शासनाकडून स्थगिती देण्यात आली होती यावर आपण न्यायालयात जात स्थगिती उठवली होती व या कामासाठी पाठपुरावा केला असल्याचे म्हटले होते. मात्र पुन्हा एकदा एकाच कामाचा दोन वेळा होणारा शुभारंभ हा कुडाळ तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.