
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांचे ओरोस येथील जिल्हा वाहतूक शाखेचे कार्यालय दुपारच्या वेळी पुन्हा बंद ठेवले जात आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्याकडे निवेदनातून केली आहे. यापूर्वी आपण याबाबतची माहिती कार्यालयात दिल्यानंतर काही दिवस हा प्रकार थांबला होता. परंतु, पुन्हा सिंधुदुर्ग वाहतूक शाखेचे कार्यालय दुपारच्या सत्रात बंद ठेवण्यात येते. त्यामुळे कार्यालयाची वेळ बाहेर लावली जावी. तसेच कार्यालय बंद असल्यास कोणत्या क्रमांकावर संपर्क साधावा ? याची माहिती देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आपण अनेक वेळा याबाबत तक्रारी केल्या आहेत. तक्रारीनंतर काही दिवस कार्यालय उघडे ठेवले जाते. मात्र, नंतर पुन्हा दुपारच्या वेळी कार्यालय बंद ठेवण्यात येते. याबाबत अधिक्षकांनी कडक पावले उचलावीत असे आवाहनही श्री.बरेगार यांनी केले आहे. याबाबतची तक्रार यापूर्वी देखील जयंत बरेगार यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली होती