
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील विजेचा लपंडाव दिवसेंदिवस वाढत असून सेव सामान्य जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच पावसाळ्यापूर्वी वीज वाहिन्यांवरील झाडे झूडपे साफ करून तालुक्यातील विजपुरवठा सुरळीत करा अशी निवेदनाद्वारे मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना तालुका प्रमुख मदन राणे यांनी केली.
निवेदनात म्हटले की, गेले काही दिवस दोडामार्ग तालुक्यातील कोनाळ, कुडासे, सासोली, साटेली, भेडशी तसेच दोडामार्ग शहरासह अनेक ग्रामीण भागांमध्ये रात्री अपरात्री वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. या विजेच्या लपंडावामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, विद्यार्थी तसेच रुग्णवर्ग मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाला आहे. वाढत्या तापमानामुळे उच्च रक्तदाब, लहान मुलांना उष्माघात, अशा प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होत असून, रात्रीच्या वेळी वारंवार खंडित होणाऱ्या वीजेमुळे जनतेच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. याचबरोबर शासकीय कार्यालयांचे कामकाज देखील ठप्प होत असल्याने सामान्य जनतेला मनस्ताप सहन करावा लागत आहे. तक्रारी असूनही वीजपुरवठा सुरळीत केला जात नाही आणि त्याच वेळी ग्राहकांना भरमसाट वीज बिले पाठवली जात आहेत. अनेक वेळा वीज बंद असताना देखील बिलांची रक्कम अधिक येत असल्याने जनतेत नाराजी आहे.
विशेषतः गरिब ग्राहकांकडून थकीत बिलाच्या कारणास्तव वीज जोडणी तोडण्याचे प्रकार वाढले आहेत, हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त होत आहे.पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना वादळ, वारा यामुळे झाडे विद्युत वाहिन्यांवर पडून वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेता, महावितरणने तत्काळ झाडांची छाटणी व साफसफाई करावी, तसेच खंडित वीज पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी युवासेना दोडामार्ग तालुकाप्रमुख मदन शिवराम राणे यांनी केली आहे.
यासंदर्भात मदन राणे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता, दोडामार्ग यांना निवेदन सादर केले असून, जर तातडीने कार्यवाही झाली नाही, तर महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी त्यांच्या सोबत संदेश राणे, निखिल कुबल, ओलवीन लोबो, सिद्धेश कासार, गणेश धुरी, प्रदीप सावंत, शंकर देसाई आदी उपस्थित होते.