
वैभववाडी : तालुक्यात गेल्या दिड दोन वर्षांत केलेली कामे निकृष्ट दर्जाची आहेत. दर्जाहीन कामांमुळे रस्ते, घाटरस्त्यातील सरक्षंक भिंती वाहुन गेले आहेत. या कामांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी सार्वजनिक बांधकामविरोधात ठाकरे शिवसेना १० ऑक्टोंबरला आंदोलन छेडणार आहे.
ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार केला. सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता आणि वैभववाडीचे उपअभियंता यांच्या देखरेखीखाली वैभववाडी तालुक्यात अनेक कामे झाली आहेत. भुईबावडा घाटात दीड दोन वर्षापुर्वी चार कोटी रूपये खर्चुन काम करण्यात आले होते. यातील उर्वरित रक्कमेतुन याच वर्षी भुईबावडा घाटात संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. या भिंतीचे काम निकृष्ट झाल्यामुळे ती वाहुन गेली.तेथील बाजुपट्टीचे काम देखील वाहुन गेले आहे. वैभववाडी-उंबर्डे रस्त्याचे काम सन २०२३-२४ मध्ये ४ कोटी रूपये खर्चुन करण्यात आले. निकृष्ट कामामुळे या रस्त्याची दुरावस्था झाली असुन वाहतुकीस अयोग्य बनला आहे. भरपावसात या रस्त्यांचे हॉटमिक्सचे काम करण्यात आले होते. खारेपाटण-गगनबावडा रस्त्यांची देखील तीच अवस्था झाली आहे. गेल्यावर्षी केलेल्या रस्त्याला आता शेकडो खड्डे पडलेले आहेत. बाजुपट्टी शिल्लकच राहीलेली नाही अशी स्थिती आहे. बांधकाम विभागाने केलेल्या निकृष्ट कामांमुळे आतापर्यत अनेक अपघात या मार्गावर झालेले आहे. अधिकारी आणि ठेकेदारांनी तालुक्यातील सर्व कामे निकृष्ट केली आहेत.
याबाबत वेळोवेळी कळवूनही संबंधितांवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे या कामांची तातडीने चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी आपण केली होती. परंतु त्यासंदर्भात कोणतीही कारवाई न केल्यामुळे १० ऑक्टोबरला बांधकाम विरोधात येथील तहसिल कार्यालयासमोर असंख्य कार्यकर्त्यासह उपोषणास बसणार असल्याचा इशारा ठाकरे शिवसेनेकडुन देण्यात आला आहे.