उबाठा शिवसेनेची बांदा ग्रामपंचायतवर धडक

Edited by: विनायक गावस
Published on: August 07, 2024 07:34 AM
views 450  views

सावंतवाडी : बांदा येथील नवीन मच्छिमार्केटचे रखडलेले उद्घाटन, वॉर्डमधील पाणी समस्या आदी विषयाकडे ग्रामपंचायतीने लक्ष देऊन समस्या मार्गी लावाव्यात यासाठी उबाठा शिवसेनेच्यावतीने बांदा ग्रामपंचायतवर धडक देण्यात आली. यावेळी उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी समर्पक उत्तरे दिल्याने संभाव्य संघर्ष टळला. तर येथील नूतन मच्छिमार्केट इमारत उद्घाटनाचा विषय कळीचा मुद्दा बनत असताना सरपंच व उपसरपंच यांनी १५ ऑगस्टपूर्वी या इमारतीचे लोकार्पण करण्याचे आश्वासन दिल्याने हा मुद्दा निकाली निघाला.


शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे रखडलेल्या विकास कामासंदर्भात आणि विविध समस्यांबाबत जाब विचारण्यासाठी बांदा ग्रामपंचायतवर धडक देण्यात आली. यावेळी सरपंच प्रियांका नाईक,उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत,ग्रामसेविका लीला मोरये,ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे,आबा धारगळकर, सौ.रुपाली शिरसाट, देवल येडवे, अरुणा सावंत,श्रेया केसरकर, दीपलक्ष्मी पटेकर,जावेद खतीब उपस्थित होते. यावेळी सत्ताधारी आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाशी बराच वेळ सकारात्मक चर्चा होऊन प्रत्येक मुद्द्यावर चर्चा झाली. 

निमजगावाडी येथील पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरून मात्र माजी सरपंच स्वप्नाली पवार आणि विद्यमान सरपंच प्रियांका नाईक यांच्यात शाब्दिक खडाजंगी पाहायला मिळाली. निवडणूक असताना आमच्या वाडीत दोन-दोन तास पाणी सोडण्यात येत होते ते मते मिळवण्यासाठी का ? असा सवाल स्वप्नाली पवार यांनी विचारत सरपंच प्रियांका नाईक फोन उचलत नसल्याचा आरोप केला. यावर सरपंच प्रियांका नाईक चांगल्याच आक्रमक झाल्या. त्यांनी स्वप्नाली पवार यांनी आपल्यावर केलेल्या आरोपावरून चांगलेच सुनावले. तुम्ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना काय काय बोलता ? तुमची भाषा कशी असते ? याबाबत सर्व माहिती असल्याचे सरपंच नाईक यांनी सांगत खडे बोल सुनावले. दरम्यान, येथील पाण्याची समस्या लवकरच निकाली काढला जाईल असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.


निमजगावाडी गवळीटेंब पेयजल योजनेबाबत येथील गिरीश भोगले यांनी प्रश्न विचारत या योजनेचा फायदा काय ? असा सवाल उपस्थित केला. तसेच हर घर शुद्ध जलबाबतही त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला प्रश्न विचारले. बांदा येथील मच्छिमार्केट नूतन इमारत बांधकामाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. माजी ग्रामपंचायत सदस्य गजानन गायतोंडे यांनी अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करीत दररोज सांगूनही एकही ग्रामपंचायत सदस्य याबाबत कार्यवाही करण्याची तसदी घेत नाही. गावातील समस्या दूर करण्यासाठी प्रसंगी जागरूक नागरिकांना बरोबर घेऊन कार्यवाही करा अशी मागणी त्यांनी केली. यावर सरपंच नाईक यांनी यापुढे गावातील वादग्रस्त असणारे प्रश्न सोडवण्यासाठी जागरूक नागरिकांना सोबत घेऊ असे सांगितले. रामनगर येथील सार्वजनिक विहिरीतील गाळ उपसा केला नसल्याचा मुद्दा अजय महाजन यांनी उपस्थित केला. यावर ग्रामपंचायत सदस्य राजाराम धारगळकर यांनी त्या विहिरीचा गाळ उपसा करण्यासाठी एक लाख रुपयांचा निधी आवश्यक आहे. मात्र ग्रामपंचायत तेवढा खर्च करू शकत नाही असे सांगितले. यावर गजानन गायतोंडे यांनी सार्वजनिक विहिरीतील गाळ उपसा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे.त्यामुळे एक लाख रुपये खर्च करू शकत नाही हा पर्याय नसल्याचे सांगितले. यावर पावसाळा संपल्यावर गाळ उपसा करण्याचे आश्वासन देण्यात आले. ओंकार नाडकर्णी यांनी वॉर्ड दोन मधील प्रश्न उपस्थित करताना जलजीवन मिशन योजनेच्या कामा संदर्भात प्रश्न उपस्थित केला.तसेच बांदा येथील स्मशानभूमीत असलेल्या विद्युत दाहिनीबाबत ओंकार नाडकर्णी, युवासेना विभागप्रमुख राजदीप पावसकर यांनी ग्रामपंचायतिला प्रश्न विचारत त्या विद्युत दाहिनीचा वापरच नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. गिरीश भोगले यांनी बांदा वाफोली रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित बुजवण्याची मागणी ग्रामपंचायतकडे केली.

उबाठा शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर यांनी मच्छिमार्केट नूतन इमारत उदघाट्न रखडल्याचा मुद्दा उपस्थित केला.यावर उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी या इमारतीचे काही काम बाकी असून ते लवकरात लवकर पूर्ण करून १५ ऑगस्ट पूर्वी लोकार्पण केलं जाईल असे आश्वासन दिले.


दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी शिष्टमंडळाच्या मागण्या तुम्ही ऐकून घेत त्या पूर्ण करण्याची ग्वाही दिली त्याबद्दल तुमचं अभिनंदन असे सांगत गावात जलजीवन मिशनचे काम किंवा इतर कामे त्यावर अंकुश हा ग्रामपंचायतीने ठेवायला हवा, संबंधित ठेकेदार कामे करून बिले घेऊन निघून जातील आणि तुम्हाला ग्रामस्थांना तोंड द्यावे लागेल. तसेच या संदर्भात असणारे अभियंता,ठेकेदार यांच्याशी आपण चर्चा करू अशी ग्वाही धुरी यांनी दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा संपर्काप्रमुख कालिदास कांदळगावकर, शिवसेना जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, शब्बीर मणियार, शिवसेना शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्ष रियाज खान, युवासेना शहरप्रमुख राजदीप पावसकर, ओंकार नाडकर्णी, विभागप्रमुख ज्ञानेश्वर येडवे, आबा सावंत,लक्ष्मण आयनोडकर, विजय जाधव, भाऊ वाळके, प्रथमेश गोवेकर,माजी ग्रामपंचायत सदस्य सुशांत पांगम,अजय महाजन,आनंद वसकर, बिपीन येडवे, शानी केसरकर, अर्णव स्वार, नागेश बांदेकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.