
कुडाळ : कुडाळ शहरात माकडांच्या वाढलेल्या उपद्रवामुळे शेतीचे व फळबागांचे होणारे मोठे नुकसान लक्षात घेऊन, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने आज वनविभागाची भेट घेऊन यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
कुडाळ वन क्षेत्रपाल सावंत यांच्याशी यावेळी चर्चा करण्यात आली. शहरात माकडांमुळे भातशेतीसह, केळी आणि नारळाचे मोठे नुकसान होत असल्याबद्दल शिष्टमंडळाने चिंता व्यक्त केली.
माकडांचा वावर मोठ्या प्रमाणात असलेल्या सांगेर्डेवाडी, कुंभारवाडी, केळबाई वाडी व कवीलकट्टे या भागांमध्ये तातडीने माकड पकडण्याचे पिंजरे लावण्यात यावेत, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
यासोबतच, माकडांच्या उपद्रवामुळे कुडाळ शहरातील शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई तात्काळ करून द्यावी, अशी देखील मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली.
वनक्षेत्रपाल कुडाळ सावंत यांनी शिवसेनेच्या सर्व मागण्यांना समाधानकारक उत्तर दिले. त्यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत, तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. त्यामुळे लवकरच उपद्रवी माकडांना पकडण्याची कारवाई सुरू होण्याची शक्यता आहे.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तसेच संदीप महाडेश्वर, अमित राणे, बाळा वेंगुर्लेकर, गुरुनाथ गडकर, रोहन शिरसाट, सुरेंद्र तेली, नागेश जळवी, दिनार शिरसाट, आपा राणे, प्रथमेश राणे, सुशील चिंदरकर, नितीन सावंत, संजय मसुरकर, विशाल राणे आणि सांगेर्डेवाडी येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










