
सावंतवाडी : समग्र शिक्षा अंतर्गत शासन अनुदानित व जिल्हा परिषद शाळांना इ. 1 ली ते 8वी च्या विदयार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी वितरीत केली जातात. या पुस्तकांची मागणी त्या-त्या शाळांचे मुख्याध्यापक ऑनलाईन पद्धतीने मागणी करतात. त्यांच्या मागणीनुसार शाळा सुरु होण्यापूर्वी त्या-त्या तालुक्यामध्ये पाठ्यपुस्तके पोहोच होतात व शाळांच्या मागणीनुसार शाळा सुरु होण्यापूर्वी 2 दिवस शाळांना पाठ्यपुस्तके पुरविली जातात अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी दिली.
सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी मागणीनुसार व बालभारतीकडे उपलब्ध असलेल्या पुस्तक संख्येनुसार सर्व तालुक्यांमध्ये वेळीच पुस्तके प्राप्त झाली व ती शाळांना पहिल्याच दिवशी शाळा प्रवेशोत्सव घेऊन वितरीत करण्यात आली.मात्र, ही मागणी दरवर्षी त्या-त्या इयत्तेच्या मागील वर्षाच्या पटसंख्येनुसार मुख्याध्यापक मागणी करत असतात. शाळा सुरु झाल्यावर पहिल्या पंधरवडा हा पटनोंदणी पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतो. या अंतर्गत काही शाळांमधील विद्यार्थी अन्य शाळेत प्रवेश घेतात, तर काही शाळांमध्ये इतर शाळांमधून तसेच विनाअनुदानित शाळांमधून तसेच जिल्हा बाहेरन विद्यार्थी प्रवेश घेतात, तसेच मराठी माध्यमाकडून सेमी इंग्रजी माध्यमाकडे किंवा इंग्रजी माध्यमाकडून मराठी माध्यमाकडे इयत्ता 5वी / इयत्ता 8 वी मध्ये आयत्यावेळी प्रवेश घेत असतात. अशा अतिरिक्त प्रवेशीत झालेल्या मुलांना मोफत पाठ्यपुस्तकांची व्यवस्था करावी लागते. प्राप्त पुस्तकांचा शाळानिहाय ताळमेळ घेऊन आवश्यक असलेल्या शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात येतो.
सावंतवाडी तालुक्याचा विचार केल्यास मागणीप्रमाणे 100% पाठ्यपुस्तके प्राप्त होती. ती प्रशासनाने वेळीच वितरीत केली होती. मात्र वर नमूद केल्याप्रमाणे जी मुले नवीन प्रवेशीत झाली किंवा माध्यम बदलून आली अशा मुलांना त्यांच्या गरजेनुसार जादाची मागणी करुन शासनाकडून पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन घ्यावी लागतात, व पुरवावी लागतात. त्याप्रमाणे शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा करुन पाठ्यपुस्तके पुरवलेली आहेत. उशीरा झालेले प्रवेश यामुळे काही किरकोळ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळाली नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण हे प्रमाण अत्यल्प आहे. त्याची पुर्तता संबंधित यंत्रणा तात्काळ करीत आहे. याची प्रक्रिया यापुर्वीच सुरु झालेली आहे असं मत व्यक्त केले. तर औषध व पुस्तक पुरवठा सुयोग्य आहे. ठाकरे सेनेन विनाकारण टीका करू नये असा पलटवार हाणला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, गजानन नाटेकर, विनायक सावंत, राजन रेडकर आदी उपस्थित होते.