
सावंतवाडी : आजरा-गगनबावडा रस्त्यावर रात्री 8 च्या सुमारास ॲम्बुलन्स आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्ते, रवी जाधव आणि लक्ष्मण कदम यांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीमुळे या दोन्ही तरुणांचे प्राण वाचले.
रुग्णाला सोडून परत येणाऱ्या ॲम्बुलन्सचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की ॲम्बुलन्समधील दोन्ही तरुण चालक आणि मदतनीस गाडीत अडकून पडले. एका तरुणाच्या पोटात स्टिअरिंग घुसले होते, तर दुसरा पूर्णपणे अडकला होता.
याचवेळी काही कामानिमित्त आजरा येथे गेलेले रवी जाधव आणि लक्ष्मण कदम यांनी हा अपघात पाहिला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्थानिक लोकांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. मोठ्या प्रयत्नांनंतर त्यांनी दोन्ही तरुणांना सुखरूप बाहेर काढत, त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या या धाडसी आणि वेळेवर केलेल्या मदतीमुळे दोन्ही तरुणांचे प्राण वाचले.