हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर मोर्लेत तणाव

दिवसभरात काय काय घडलं ?
Edited by: लवू परब
Published on: April 08, 2025 19:25 PM
views 62  views

दोडामार्ग : तिलारी खोऱ्यात हौद्स घालणाऱ्या वन्य हत्तीकडून मोर्ले गावात एका शेतकऱ्याचा नाहक बळी गेला. वयोवृद्ध शेतकऱ्याला प्रथमत: सोंडेत धरून आदळले व नंतर पाय ठेऊन ठार मारल्याची घटना मंगळवारी घडली. लक्ष्मण यशवंत गवस ( ७० ) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. यावेळी तालुक्यासह तिलारी पंचक्रोशीतील नागरिक आक्रमक झाले व वनविभागाला चांगले फैलावर घेत जो पर्यंत हंत्ती पकड मोहीम राबवणार असे लेखी आश्वासन द्या त्या नंतरच मृतदेह हलवीणार असा पवित्रा घेतला. अखेर लेखी पत्र देण्याचे ठरल्या नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. मात्र जो पर्यंत हंत्ती हटाव चे लेखी पत्र मिळत नाही तो पर्यंत प्रशासन व लोकप्रतिनिधी गावाच्या बाहेर जाणार नाही असा आक्रमक पवित्र्क घेत सर्वांना गावात रोखून ठेवले.

याबाबत अधिक माहीत अशी की  शेतकरी लक्ष्मण गवस हे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी  त्यांच्या काजू बागायतीत गेले होते. तब्बल तासभर उलटूनही ते घरी न परतल्याने त्यांचे बंधू रमाकांत गवस हे त्यांना पाहण्यासाठी जात असता  येथे एक व्यक्ती पडली असल्याचे त्यांना दिसले. जवळ जाऊन पाहिले असता ती व्यक्ती आपला भाऊच असल्याचे त्यांना दिसले. यावेळी ते मोठ्याने ओरडले. लगतच्या जमिनीत असलेल्या इतर शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. लक्ष्मण गवस यांना हत्तीनेच मारले असावे असा संशय त्यांच्या मनात निर्माण झाला. मयत लक्ष्मण गवस यांच्या आसपासच्या परिसरात निरीक्षण केले असता हत्तीच्या पाऊलखुणाही त्यांना दिसल्या.

उपस्थित ग्रामस्थांनी लागलीच या घटनेची माहिती वनविभागाला दिली. वनक्षेत्रपाल वैशाली मंडल, वनपाल किशोर जंगले व त्यांचे संपूर्ण पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे व त्यांचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने सर्व वस्तुस्थिती पाहिली व तेथे हत्तीच्या लागलेल्या पाऊलखुणा वरून हत्तीनेच याला ठार केल्याचे प्रथमदर्शनी सांगितले. विविध राजकीय पक्षांची पदाधिकारी, प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊ लागले. यावेळी भाजपा उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुका प्रमुख संजय गवस,  शिंदे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर,  स्वराज्य सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, ठाकरे युवासेना तालुका प्रमुख मदन राणे, मोर्ले सरपंच संजना धुमास्कर, ग्रामस्थ गोपाळ गवस, पंकज गवस, प्रथमेश गवस व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिकाऱ्यांनी केले मौन धारण

मयत लक्ष्मण गवस यांचा मुलगा सावंतवाडी येथे वास्तव्यास आहे. त्यामुळे ते येईपर्यंत ग्रामस्थ वाट पाहत बसले होते. मात्र उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड, वनक्षेत्रपाल सुहास पाटील येताच उपस्थित ग्रामस्थांचा पारा चढला. यावेळी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. हत्ती पकड मोहीम राबविण्याची मागणी वारंवार आपल्याकडे केली. मात्र आपण याची कोणतीही दखल न घेतल्याने आज एका निष्पाप शेतकऱ्याला त्याचा जीव गमावावा लागला. याला सर्वस्वी वनविभाग जबाबदार आहे. ही घटना तुमच्या वनक्षेत्रात झाली असती तर आमच्यावर गुन्हे दाखल केला असता.  या घटनेची जबाबदारी कोण घेणार? तुमच्या प्राण्यांमुळे आमचा एक माणूस मृत्यूमुखी पडला आहे. त्यामुळे तुम्हा अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व नाकर्तेपणामुळे आम्हा शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत असल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी करत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. यावेळी अधिकारी निरुत्तर झाले.


प्रशासन - लोकप्रतिनिधींना रोखून ठेवले

यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व त्यांचे भाजपाचे तालुका पदाधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. संतप्त ग्रामस्थांनी पालकमंत्री व स्थानिक आमदारांबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. हत्ती हटाव साठी सुरू असलेल्या उपोषणावेळी ज्या लोकप्रतिनिधींनी आम्हाला आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. आम्ही त्यांच्या या विनंतीला मान देऊन उपोषण मागे घेतले हीच आमची सर्वात मोठी चूक आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिनिधींनी प्रथम आम्हाला उत्तरे द्यावीत असा आक्रमक पवित्रा संतप्त ग्रामस्थांनी घेतला. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी इतरत्र असलेल्या वन अधिकाऱ्यांना मृतदेहाजवळ येण्यास सांगितले. मात्र अधिकारी यात विलंब करू लागल्याने ग्रामस्थ अधिकच संतापले. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. तात्काळ मृतदेहाजवळ या अन्यथा एखादा अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी आपणच जबाबदार राहणार असल्याचे ठणकावून सांगताच व ग्रामस्थांचा आक्रमकपणा पाहून वन अधिकारी व कर्मचारी मृतदेहाजवळ येऊ लागले. हत्ती पकड मोहीम केव्हा राबवणार? ते प्रथम सांगा व तसे पत्र द्या. मगच इथून तुम्हाला जाऊ देणार असे सांगितले. त्यानंतर राजकीय पदाधिकाऱ्यांना विचारणा करत आपण आपल्या नेत्यांना कितीवेळा हत्ती पकड मोहीम राबविण्याबाबत सुचविले असा सवाल केला. आमच्या प्रश्नांची जोपर्यंत समर्पक उत्तरे देत नाही तोपर्यंत तुम्हाला येथून सोडणार नाही असे ठणकावत अधिकारी व पदाधिकाऱ्यांना मृतदेहाजवळ रोखून ठेवले.


विरोधक - सत्त्ताधारी यांच्यात तुतू मैमै

       उपस्थित ग्रामस्थांनी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आपण किंवा आपल्या नेत्यांनी काय प्रयत्न केलेत असा प्रश्न विचारताच शिंदे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर यांनी स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केले. यावेळी ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आपल्या खासदारांच्या कार्यकाळात माणगाव खोऱ्यात हत्ती पकड मोहीम राबविली. मग आता हत्ती पकड मोहीम राबविण्यास सरकारला काय अडचणी येत आहेत? असे म्हणत राजेंद्र निंबाळकर व बाबुराव धुरी यांच्यात श्रेय वादावरून तु तु मैं मैं झाली. ग्रामस्थांनी यांच्यातील वाद थांबवत येथे पक्षीय राजकारण करू नका. आम्हाला न्याय द्या अशी विनवणी केली.


तो पर्यंत मृतदेह हलविणार नाही

आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच तुमच्या वनविभागात हत्ती विषयी जाणकार कर्मचारी किंवा अधिकारी असेल तर त्याला आमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगा. यावेळी वनविभागाचे सर्व अधिकारी निरुत्तर झाले. हत्ती पकड मोहिमेचा प्रस्ताव सध्या कोठे रेंगाळत पडला आहे अशी विचारणा मयत यांचे पुतणे पंकज गवस यांनी केली. यावेळी तो प्रस्ताव मुंबईला असल्याचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी सांगितले. अद्यापही मुंबईतच प्रस्ताव पडला असून तो वरिष्ठांकडे मंजुरीसाठी जाणार की नाही अशी विचारणा केली. शिवाय  एक तासात याबाबत योग्य उत्तर देत हत्ती हटावचा आदेश घेऊन या अशी एकमुखी मागणी उपस्थित ग्रामस्थांनी केली. जोपर्यंत आदेश देत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह हलवू देणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी गावाच्या दिशेने मोबाईल नेटवर्क साठी निघून गेले. 

ग्रामस्थांनी रोखल्या गाड्या

जोपर्यंत हत्ती हटाव बाबत शासन किंवा वनविभाग आदेश देत नाही तोपर्यंत या गावात आलेल्या एकाही अधिकारी किंवा पदाधिकाऱ्याला गावातून बाहेर सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. त्यानंतर गावातून बाहेर पडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या गाड्या ग्रामस्थांनी रोखून धरल्या. पोलिसांनी गाडी सोडण्याची मागणी ग्रामस्थांकडे केली. मात्र, आमच्या गावातील एका निष्पाप ग्रामस्थांची घटना घडली असून तुम्ही आम्हाला सहकार्य करा अशी विनवणी पंकज गवस व ग्रामस्थ करू लागले.

तब्बल आठ तासांनी मृतदेह हलविला 

ग्रामस्थांचा आक्रमकपणा पाहून अधिकारी धडपड करू लागले. काही वेळानंतर राजेंद्र निंबाळकर घटनास्थळी येत एक तासानंतर हत्ती पकड राबविण्याबाबत पत्र मिळेल, तोपर्यंत मृतदेह हलविण्यास सहमती द्या अशी विनंती त्यांनी उपस्थितांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी साटेली-भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला.


मयत लक्ष्मण गवस यांचे सुपुत्र विनय गवस हे दिव्यांग असून सावंतवाडी येथे वास्तव्यास आहेत. घटनेची माहिती मिळताच ते मोर्लेत आले व त्यांनी घरी पाण्याचा घोटही न घेता ग्रामस्थांच्या मदतीने घटनास्थळी वडिलांना पाहण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यांनी जोरात टाहो फोडत वनविभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. ही हृदयद्रावक घटना काळीज पिळवटून टाकणारी होती. लक्ष्मण गवस यांच्या पश्चात मुलगा, सून व एक नातू आहे.