
कणकवली : मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव मोरयेवाडी येथे गुरुवारी सहा सीटर मॅजिक आणि टेम्पो ट्रॅव्हल्स यांच्यात झालेल्या अपघातात ६ शाळकरी विद्यार्थी जखमी झाले. तसेच मॅजिकचे आहे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर टेम्पो ट्रॅव्हल्सचा चालक वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. हा अपघात गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास झाला.
सहा सीटर मॅजिक वाहन नांदगावहून शालेय विद्यार्थ्यांना घेऊन कणकवलीच्या दिशेने येत होती. मोरयेवाडीजवळ मॅजिक आली असता भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की मॅजिकमधील विद्यार्थी जखमी झाले. मात्र, टेम्पो ट्रॅव्हल्सचा चालक अपघातानंतर तातडीने पळून गेला.
अपघातात मॅजिक मधील असद सिराज साटविलकर (१३, नांदगाव), जानवी कापसे (१५), रेहान मौसीन नावलेकर (११), सुफियान मौसीन नावलेकर (९), मुस्ताहिन मोबिन मोबिलकर (१६), दिशा जयवंत बिडये (१५) हे विद्यार्थी जखमी झाले. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय आणि काही खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच, पोलीस हवालदार सुभाष शिवगण आणि अन्य पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून जखमी विद्यार्थ्यांना मदत केली. पळून गेलेल्या टेम्पो ट्रॅव्हल्सचा मालक कोण आहे याचाही पोलिसांनी शोध घेतला. मात्र मॅजिक चालकाने तक्रार न दिल्याने अपघाताची सायंकाळी उशिरापर्यंत कणकवली पोलीस ठाण्यात नोंद नव्हती.










