
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग मार्फत प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षीही शिष्यवृत्ती सराव परीक्षा आयोजित करण्यात आली असून या वर्षी ही परीक्षा शुक्रवार दि १९ जाने २०२४ रोजी आठही तालुक्यात १२६ परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे.या परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एकूण १९५४ विध्यार्थी सहभागी होतील.
शिक्षक समिती सिंधुदुर्ग मार्फत जिल्हास्तरावर मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन गेली काही वर्षे सातत्याने करण्यात येत आहे.इयत्ता ५ वीचे जिल्हा परिषद शाळांतील जे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट झाले आहेत अशा सर्व विदयार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे.या परीक्षेत यशस्वी ठरणाऱ्या जिल्हयातील टॉप टेन विद्यार्थ्यांना कार्यक्रमातून गौरविण्यात येते.
यावर्षीच्या सराव परीक्षेचे उदघाटन प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर तसेच मालवण गटशिक्षणाधिकारी संजय माने यांचे उपस्थितीत कुणकवळे ता.मालवण येथे होणार आहे.यावेळी संघटनेचे राज्य,जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या सराव परीक्षेनंतर लगेचच पेपर तपासणी करून निकाल जाहीर करण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यातून तालुक्यातील टॉप विद्यार्थी व त्यातून जिल्ह्यातील टॉप टेन विध्यार्थी निवडून विशेष कार्यक्रमात त्यांना सन्मानीत करण्यात येईल.
या परीक्षेतील टॉप विध्यार्थी नेहमीच फायनल परीक्षेतही गुणवत्ता धारक होत असतात हे ही ह्या परीक्षेचे खास वैशिष्ट आहे. सराव परीक्षेचे पेपर सेट करण्याचं काम मालवण शाखेचे परीक्षा मंडळ सदस्य व शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शक संतोष नेरकर, विलास सरनाईक, रामचंद्र कुबल, श्रद्धा वाळके यांनी मंगेश कांबळी यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे.
तरी जि प शाळेतील इ.५ वी शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस व सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी केले आहे.