
सावंतवाडी : येथील मिलाग्रीस इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या निवृत्त शिक्षिका क्लावडीया वेलांटीन परेरा (वय ४५) यांचे गुरुवारी रात्री उपचारादरम्यान निधन झाले. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. त्यामुळे त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. गुरुवारी सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे कोलगाव येथील एका खासगी रुग्णालय दाखल करण्यात आले होते. मात्र साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
क्लावडीया परेरा या १४ वर्षे मिलाग्रीस प्री - प्रायमरी स्कूलमध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शिकवत होत्या. त्या बालकांच्या लाडक्या शिक्षिका म्हणून परिचित होत्या. त्यामुळे त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांसह पालक वर्गाकडून शोक व्यक्त करण्यात आला. त्यांच्या मृतदेहावर शनिवारी सकाळी दहा वाजता खासगीलवाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तर मिलाग्रीस प्रायमरी स्कूलला शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे असा परिवार आहे.