करवाढीविरोधात सर्वपक्षीय उद्या फुंकणार रणशिंग

प्रशासनाविरोधात सर्वपक्षीय एकवटले
Edited by: विनायक गांवस
Published on: March 04, 2023 22:07 PM
views 187  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद प्रशासक यांनी अर्थसंकल्प शहरातील नागरिकांवर लादला आहे. पाणी पट्टी आणि घरपट्टीत वाढ करणाऱ्या या अर्थसंकल्पाच्या विरोधात शहरात प्रत्येक घराघरात जनजागृती करूयात आणि त्यानंतर कर वाढ रद्द होईपर्यंत साखळी धरणे आंदोलन, महिला मोर्चा, वॉर्डा वॉर्डात घंटानाद, घागर मोर्चा काढुया तसेच याबाबत धोरण ठरविण्यासाठी उद्या रविवार दि. ५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता केशवसुत कट्टावर सर्व नागरिक, सर्वपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जमून पुढील दिशा देण्याचा निर्णय आज आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी नगरपरिषद प्रशासक यांनी अर्थसंकल्प सादर करताना पाणी पट्टी आणि घरपट्टीत भरमसाठ वाढ केली असल्याने राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गुरूकुल येथे आयोजित केली होती. काँग्रेस, ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


यावेळी शिवसेना माजी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल परुळेकर, पर्यटन तज्ञ डि के सावंत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच मोती तलावाच्या काठावर केशवसुत कट्टा आहे तेथील तुतारीचा अवमान केला म्हणून निषेध नोंदवला आणि चौकशीची मागणी करण्यात आली.


सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकेच्या तोंडावर प्रशासक असलेल्या मुख्याधिकारी यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये पाणी पट्टी आणि घरपट्टीत वाढ केली ती वास्तववादी नाही. पाणी योजना गुरुत्वाकर्षणावर आहे त्यामुळे ती फायद्यात आहे. मुख्याधिकारी यांनी चुकीच्या पद्धतीने कर आकारणी केली त्या विरोधात आवाज उठविण्यासाठी घरोघरी जाऊन जनजागृती करावी. सर्व पक्षीय आणि नागरीकांनी एकत्रित करून आंदोलन केले पाहिजे. घरपट्टी २५ ते ८५ घरपट्टी होती, ती ८०० रूपये केले. पाणी पुरवठा योजना ४६ कोटी वरून ५७ कोटी रुपयांची झाली आहे असं मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले.


यावेळी वसंत उर्फ अण्णा केसरकर म्हणाले, लोकप्रतिनिधी, पक्षीय राजकारणाची भिती नोकरशाहीला राहीली नाही. त्यामुळे जनतेच्या हितासाठी आपण लढा दिला पाहिजे. मुख्याधिकारी शासन परिपत्रक नाचवत आहेत त्याचा अभ्यास करून पर्दाफाश केला पाहिजे. त्यानंतर आंदोलनाला दिशा मिळेल. डोंगरी भागात कर आकारणी करता नाही.आज प्रचंड प्रमाणात महागाई वाढली आहे त्यामुळे सर्वसामान्य लोक स् झाले आहेत.


काँग्रेसचे शहराध्यक्ष अँड राघवेंद्र नार्वेकर, कोरोनातून लोक सावरले नाहीत. प्रचंड महागाईमुळे लोक त्रस्त झाले आहेत. नगरपरिषदेवर प्रशासक असल्यामुळे अर्थसंकल्प वास्तववादी सादर केला नाही.राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी म्हणाले, नागरिकांच्या अपरोक्ष कर वाढवला आहे त्यामुळे आंदोलन छेडले पाहिजे. नागरिकांच्या माथ्यावर कर मारताना शासनाला दायित्व देण्यासाठी कारण दिले जात आहे.शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ म्हणाले, मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याशी चर्चा केली असता ते परिपत्रक नाचवत आहेत. दंड बसेल म्हणून पाणी पट्टी आणि घरपट्टीत वाढ केली हे गैर आहे. कर वाढी विरोधात जनजागृती करून विरोध केला पाहिजे. माजी नगरसेवक उमाकांत वारंग म्हणाले, कर वाढीला विरोध करत जनजागृती करण्याची गरज आहे.


यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, नगरपरिषद माजी पाणी पुरवठा सभापती अफरोज राजगुरू, काँग्रेसचे समिर वंजारी, सुरेश भोगटे, समिरा खलिल, आदींनी भूमिका मांडली.यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, जेष्ठ समाजसेवक अण्णा केसरकर, ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, मनसेचे आशिष सुभेदार, माजी नगरसेवक उमाकांत वारंग, सुरेश भोगटे, अफरोज राजगुरू, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष समीर वंजारी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अँड राघवेंद्र नार्वेकर, ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, शिवसेना शहरप्रमुख शैलेश गवंडळकर, संतोष तळवणेकर,जिकर मेमन, इफ्तिकार राजगुरू, राकेश नेवगी, रवी जाधव, समिरा खलिल, नंदू मोरजकर, अभय पंडित व पदाधिकारी उपस्थित होते.