शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन

तानाजी सावंत यांचा इशारा
Edited by: विनायक गावस
Published on: December 07, 2023 19:35 PM
views 87  views

सावंतवाडी : शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करा अन्यथा भारतीय किसान संघ तीव्र आंदोलन उभारणार असा इशारा जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी दिली. याबाबतच सावंतवाडी व कुडाळ येथे उपविभागीय अधिकाऱ्यांना लक्षवेधी मागण्या निवेदन त्यांनी सादर केलं. 

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या वारंवार शासनाकडे देऊनही शासन त्यावर गांभीर्याने निर्णय घेत नाही. यासाठी भारतीय किसान संघाच्यावतीने महाराष्ट्रभर सर्व प्रांताधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना लक्षवेधी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात वन्यप्राणी , पक्षी, जीव यांच्या कडून होणाऱ्या पिकाच्या नुकसानीची १००%भरपाई सरकारने करावी अन्यथा त्यांच्यापासून संरक्षण करण्याचे अधिकार शेतकऱ्याला द्यावेत, प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांना जाहिर करण्यात आलेले प्रोत्साहन अनुदान ₹५००००/- अद्याप मिळालेले नाही ते तात्काळ जमा करावे, वीज बिल आकारणी मध्ये अनागोंदी असल्याने एकवेळ वीजबिल सरसकट माफ करावे तसेच अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत केंद्र सरकार कडून मिळणारे वीज पुरवठा अनुदान व त्याचा विनियोग यावर श्वेत पत्रिका काढावी आदि मागण्या केल्या. तसेच मागेल त्याला विनाअट ९०%अनुदानावर सौर शेतीपंप योजना उपलब्ध करून द्यावी

यासह एकुण 12 मागण्यांचे निवेदन सिंधुदुर्गात सावंतवाडी येथे उपविभागीय अधिकारी प्रशांत पानवेकर व कुडाळ येथे नायब तहसीलदार प्रदिप पवार यांना  देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, उपाध्यक्ष सुर्यकांत कुंभार, सुधीर राऊळ यांसह जिल्हा व तालुका कार्यकारिणी व मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.