देवगड : देवगड तालुक्यातील जामसंडे मो गोगटे हायस्कूल येथे उद्या पासून २६ व २७ नोव्हेंबर या दोन दिवशी ५२ वे देवगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मंगळवारी सकाळी९.३० ते दु. ४.०० वा. या कालावधीत श्री. मो. गोगटे माध्यमिक विद्यामंदिर, जामसंडे, तालुका देवगड येथे आयोजित करण्यात आले आहे. शिक्षण विभाग पंचायत समिती देवगड व विद्या विकास मंडळ जामसंडे संचालित श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक व उच्च माध्यमिक (व्यवसाय) विद्यामंदिर, जामसंडे, तालुका देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने ५२ वे देवगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचा मुख्य विषय ‘शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान’ हा असून या प्रदर्शनात देवगड तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक, व उच्च माध्यमिक विद्यालयांमधील विद्यार्थी विज्ञान प्रतिकृती सादर करणार आहेत. तसेच प्राथमिक, माध्यमिक, व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर यांच्याही विज्ञान प्रतिकृती मांडण्यात येणार आहेत. सलग दोन दिवस चालणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनात दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी प्राथमिक गट व माध्यमिक गट अशा दोन गटांमधून निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा होणार आहेत.
तर बुधवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ रोजी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यार्थी प्रतिकृती, शिक्षक प्रतिकृती, प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर प्रतिकृती यांच्या प्रतिकृतींचे परीक्षण होणार आहे. तरी तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा यांनी विज्ञान प्रदर्शनात सहभाग घ्यावा . तसेच सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ विज्ञान प्रेमी यांनी विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन . श्रीरंग काळे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती देवगड व संजय गोगटे, मुख्याध्यापक, मो. गोगटे माध्यमिक विद्यामंदिर जामसंडे यांनी केले आहे.