काजू हमीभावासाठी चर्चा सुरू...!

Edited by: विनायक गावस
Published on: April 06, 2024 11:32 AM
views 178  views

सावंतवाडी : सावंतवाडी दोडामार्ग फळबागातदार संघाच्या वतीने काजूला हमीभाव मिळावा म्हणून सुरू केलेल्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दखल घेऊन चर्चा सुरू केली आहे. येत्या रविवार ७ एप्रिल रोजी राणे यांची भेट बागायतदार शेतकरी घेणार आहेत. दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी फळबागायतदार व शेतकऱ्यांची आपल्या श्रीधर अपार्टमेंट मधील कार्यालयात चर्चा केली यावेळी ३० ते ४० काजू बागायतदार उपस्थित होते. सरकारने काजू बागायतदारांना १३५ रुपये प्रति किलो हमीभाव आणि दहा रुपये प्रति किलो अनुदान देण्याबाबतचा निर्णय आचारसंहीते पुर्वीच सरकारने घेतला आहे. मात्र, आचारसंहितेमुळे त्याची अंमलबजावणी करण्यास काही अडथळे निर्माण झाले असल्याचे चर्चेदरम्यान समोर आले आहे. केसरकर यांनी खास याबाबत चर्चा केली असे सावंतवाडी दोडामार्ग संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी म्हटले आहे. तसेच पुन्हा मंगळवारी काजू कारखानदार यांच्यासह बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे असे मंत्री दिपक केसरकर यांनी या बैठकीत स्पष्ट केले त्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांनी त्याला संमती दिली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काजू बी ला हमीभाव मिळावा याबाबत चर्चा करण्यासाठी बागायतदार संघाच्या शिष्टमंडळाला रविवार दि.७ एप्रिल रोजी वेळ दिला असून यावेळी या बैठकीत चर्चा होईल असे विलास सावंत यांनी म्हटले आहे.