तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट !

ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विनायक राऊत यांना दिले निवेदन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 09, 2024 06:46 AM
views 454  views

वैभववाडी : तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुपदरीकरणाचे काम नाधवडे ते कोकिसर आणि करुळ घाट असे दोन टप्प्यांत सुरु आहे. परंतु, ठेकेदाराकडून अत्यंत संथगतीने तसेच निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. याबाबत आपण लक्ष घालून हे केंद्रीय दळणवळण मंत्र्यांच्या निदर्शनास आणून द्यावे, अशी मागणी ठाकरे शिवसेनेने खासदार विनायक राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

      उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके व पदाधिकाऱ्यांनी खासदार राऊत यांना निवेदन दिले. त्यामध्ये म्हटले आहे की,'चार वर्षांपूर्वी केंद्र शासनाकडे व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आपण केलेल्या मागणीमुळे या राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला. तद्नंतर दुपदरीकरणास मंजूरी मिळून कामाची तात्काळ निविदा प्रक्रिया करण्यात आली. मात्र कामाला सुरुवात करण्यास ठेकेदाराने विलंब केल्यामुळे हे काम तात्काळ सुरु होण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपल्या नेतृत्वखाली अंदोलनही केले होते. त्यानंतर लगेचच हे काम सुरु करण्यात आले होते.

    परंतु, गेल्या चार महिन्यांमध्ये या रस्त्याच्या कामाच्या प्रगतीमध्ये अपेक्षित सुधारणा होताना दिसत नाही. त्याच प्रमाणे नाधवडे ते कोकिसरे पर्यंतचा ५ किलोमीटरच्या रस्त्याचे निकृष्ट पध्दतीने काम चालू आहे. रुंदीकरणाच्या भरावावर व्यवस्थित रोलींग नकरताच कॉंक्रिटीकरणाचे काम चालू आहे. त्याचप्रमाणे कॉंक्रिटवर पाण्याचा वापर केला जात नसल्याचे निदर्शनास येत आहे.

    तसेच जलदगतीने काम करता यावे म्हणून जिल्ह्याच्या दळणवळणाचा प्रमुख मार्ग असलेला 'करुळ घाट' रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. मात्र, गेल्या दीड महिन्यात मोजक्या मोऱ्यांव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे काम झालेले दिसत नाही. त्यामुळे या कामाला ठेकेदाराकडून विलंब का होतोय? याची चौकशी करावी. तसेच ही वस्तुस्थिती केंद्रीय दळणवळण मंत्र्यांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.


धुळीमुळे प्रवासी, लगतचे घरमालक त्रस्त

     नाधवडे ते कोकिसरे ५ किलोमीटर दुपदरीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ता पुर्ण मातीमय असून धुळीवर पाणी मारण्याची आवश्यकाता असताना त्या ठिकाणी पाणी मारले जात नाही. त्यामुळे वैभववाडी-तळेरे असा प्रवास करण्याऱ्या छोट्या व मोठ्या वाहनधारकांना आणि विशेषतः रस्त्याच्या शेजारील घर मालकाना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लगत आहे. शिवाय रस्त्यालगतच्या काजू बागा धुळीमुळे निकामी झाल्या आहेत. या बाबत प्रशासनाकडे वेळोवेळी कल्पना देऊनसुध्दा महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व ठेकेदार याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत, असे मंगेश लोके यांनी निवेदनात म्हटले आहे.