सावंतवाडी : शहरात वस्तीत येणाऱ्या बिबट्या, गवारेड्यांसह वन्य प्राण्यांची उपाययोजना करा, अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेकडून उप वनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांच्याकडे करण्यात आली. यावेळी बिबट्याबाबत तातडीने उपाययोजना करण्यात येणार असून इतर वन्य प्राण्यांपासून मनुष्यहानी होणार नाही याची दक्षता घेऊ असे आश्वासन श्री. रेड्डी यांनी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, शहरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले आहे. नुकताच येथील माठेवाडा भागात पाळीव कुत्र्याला त्यांने भक्ष केले आहे. तसेच गवारेडे यांसह अन्य वन्यप्राणी नरेंद्र डोंगर भागात राहत असून ते मनुष्य वस्तीमध्ये येत असतात. यामुळे मनुष्य हानीची शक्यता अधिक बळावते. हिवाळा ऋतू संपून उन्हाळ्याचे दिवस सुरू होणार असल्याने जंगल भागात पाण्याचे प्रमाण कमी होत आहे. वणवा पेटण्याचे प्रकार घडतात. त्यादृष्टीने योग्य ती दक्षता घ्यावी तसेच पाण्याच्या शोधात मनुष्य वस्तीमध्ये हे वन्यजीव येत असल्याने या प्राण्यांची सोय जंगलभागात व्हावी या दृष्टीने उपाययोजना करावी. त्याचप्रमाणे, बिबट्यापासून मनुष्य वस्तीत कोणाला इजा व जीवीत हानी होऊ नये याकरीता योग्य ती खबरदारी घेऊन उपाययोजना करावी.
याचा गांभिर्याने विचार करुन योग्य ती कार्यवाही व्हावी अशी विनंती युवा रक्तदाता संघटनेकडून करण्यात आली. यावर उप वनसंरक्षक श्री. रेड्डी यांनी समाधानकारक प्रतिसाद दर्शविला. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, नंदू गावडे, मेहर पडते, अनिकेत पाटणकर, अर्चित पोकळे, दिग्विजय मुरगोड आदी उपस्थित होते.