ठाकर समाजाला दाखले नाकारणाऱ्या 'त्या' अधिकाऱ्यावर कारवाई करा : नितेश राणे

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 28, 2023 11:55 AM
views 467  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाच्या विद्यार्थ्यांना मुद्दामहून जातीचे दाखले नाकारणाऱ्या ठाणे येथील जात पडताळणी विभागातील पावरा नावाच्या अधिकाऱ्याची  तातडीने बदली करा. हे अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाच्या विद्यार्थ्यांना मुद्दामून त्रास देतात. त्यांचे दाखले नाकारतात, अडवून ठेवतात. अखेर या विद्यार्थ्यांना न्यायालयात जाऊन दाद मागावी लागते आणि न्यायालय ते दाखले वैध ठरवते.

याचाच अर्थ पूर्णतः नियमात असलेले दाखले हे अधिकारी मुद्दामून नाकारत असतात. अशा अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी आणि त्यांची त्या ठिकाणाहून बदली करावी अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी विधान सभेत  केली. या मागणीवर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्री गावित यांना सुचित करताना आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केलेला प्रश्न हा महत्त्वाचा आहे. त्यांची सूचना गांभीर्याने घ्या. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन त्या अधिकाऱ्यावर उचित कारवाई करा असे स्पष्ट आदेश दिले.

दरम्यान, आदिवासी विकास मंत्री  विजयकुमार गावित यांनी  या संदर्भात आमदार नितेश राणे यांच्या मागणी प्रमाणे कारवाई करून समाधानकारक  निर्णय करून दिला जाईल अशा आश्वासन दिले.