स्वयंभू देवस्थान श्री देव पाटेकर चरणी भाविक लीन

Edited by: विनायक गावस
Published on: August 21, 2023 14:02 PM
views 568  views

सावंतवाडी : भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्वयंभू देवस्थान श्री देव पाटेकर चरणी आज पहिल्याच श्रावणी सोमवारी भाविक लीन झाले. नागपंचमी व पहिला श्रावणी सोमवार असा दुग्धशर्करा योग आल्यानं जिल्ह्यासह गोव्यातील भक्तगण दर्शनासाठी सावंतवाडीत दाखल झाले होते. 


सावंतवाडी संस्थानचे दैवत श्री देव पाटेकर देवस्थानात राजघराण्याचे राजेसाहेब खेमसावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या उपस्थितीत पहाटे पुजा, अभिषेक आदी धार्मिक विधी पार पडले. पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त दरवर्षी प्रमाणे जिल्ह्यासह गोवा राज्यातील भाविक दर्शनासाठी सावंतवाडी दाखल झाले होते. त्यात नागपंचमी असल्यानं भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.


४०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्वयंभू श्री पाटेश्वर चरणी भाविक नतमस्तक झाले. खेमसावंत पहिले यांना ओटवणे गावी एका झाडाखाली निद्राधीन असतांना जवळच्या बिळातून एक सर्प बाहेर येऊन त्याने त्यांच्यावर आपला फणा पसरून धरला होता. पुढे या दैवताचा आशिर्वाद राजघराण्यावर कायम राहिला. याबद्दलची नोंद इतिहासात आढळते. नंतरच्या काळात राजघराण्याकडून या दैवतास बसण्यासाठी पाटा बांधून दिला.  तेव्हापासून पाटेश्वर असं या दैवतास संबोधल जाऊ लागलं.

शहरावासियांच देव पाटेकर हे आराध्य दैवत असून गोवा, कर्नाटकातील भाविक देखील श्रावण महिन्यात या ठिकाणी दर्शनासाठी येतात. तर ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व दोन शिवलिंग असणाऱ्या एकमेव आत्मेश्वर मंदीरातही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तिसरे खेम सावंत भोंसले यांच्या काळात ह्या मंदीराची स्थापना झाली होती. आत्मेश्वर आणि प्राणेश्वर अशी दोन शिवलिंग गाभाऱ्यात या आहेत‌. जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या आत्मेश्वर चरणी शेकडो भाविक नतमस्तक झाले.