जीवनाशी संघर्ष करणाऱ्या स्वानंदीला सामाजिक बांधिलकीचं बळ !

Edited by: विनायक गांवस
Published on: February 20, 2024 09:55 AM
views 194  views

सावंतवाडी : जिद्द चिकाटी आणि मेहनत घेण्याची प्रबळ इच्छा असली की कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते. याच जिद्दीने स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त असतानाही शिकण्याची महत्वाकांक्षा व जगण्याची उमेद घेऊन जीवनाशी संघर्ष करणाऱ्या सावंतवाडी शहरातील भटवाडी येथील स्वानंदी दशरथ गावकर या १६ वर्षीय विद्यार्थिनीला भरारी घेण्यासाठी तिच्या पंखांना बळ देण्याचे काम सावंतवाडीतील सामाजिक बांधिलकी संघटनेने केले. तिच्या आजारावर उपचार करण्यासाठी या संघटनेने तिला मदतीचा हात देत संघर्षाचे बळ दिले.

स्वानंदी गावकर ही आपल्या परिवारासोबत भटवाडी येथे भाड्याच्या घरामध्ये राहत असून वि. स खांडेकर विद्यालयामध्ये दहावीच्या वर्गात शिकत आहे. ती हुशार विद्यार्थिनी आहे परंतु सध्या ती स्वादुपिंड्याच्या आजाराने त्रस्त झालेली आहे. तिच्या उपचारासाठी जवळपास दोन लाख इतका खर्च अपेक्षित आहे. मात्र, तिचे वडील मोल मजुरी करतात. मुलीचे आजारपण व घरचा खर्च भागवणे त्यांना कठीण होत आहे. वि. स खांडेकर शाळेच्या शिक्षकांनी देखील तिच्या उपचारासाठी हातभार लावलेला आहे.

या विद्यार्थिनीच्या संघर्षाची माहिती मिळताच सामाजिक क्षेत्रात नेहमीच मदतीसाठी पुढाकार घेणाऱ्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने पुढे येऊन सदर मुलीच्या उपचारासाठी आर्थिक मदत केली. यावेळी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते संजय पेडणेकर, शरद पेडणेकर, शामराव हळदणकर, अशोक पेडणेकर, रवी जाधव व वि. स खांडेकर शाळेचे धुमाळे सर उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सदर मुलीच्या उपचारासाठी दानशूर व्यक्तींना मदतीसाठी आवाहनही करण्यात आले असून स्वानंदी दशरथ गावकर सिद्धी दशरथ गावकर Ac/3992996509 lFSC CBIN 0283536 सेंट्रल बँक ऑफ इंडिया सावंतवाडी मो. नंबर 8055728695 या नंबरवर संपर्क साधून तिच्या खात्यात थेट मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.