राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत गणेश नाईक यांचे सुयश !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 27, 2024 07:47 AM
views 964  views

देवगड :  महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (पुणे) अंतर्गत संशोधन विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२३-२४ मध्ये मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेंडूर – खरारे येथील प्राथमिक शिक्षक गणेश नाईक यांनी आठवा क्रमांक पटकाविला.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संशोधन विभागामार्फत पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेच्या प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक गटातून गणेश नाईक यांनी हे यश मिळविले. यावर्षी जिल्हास्तरावर झालेल्या नवोपक्रम स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेंडूर खरारे येथील गणेश नाईक यांचा ततीय क्रमांक आला होता.

जिल्हास्तरावरील पहिल्या पाच स्पर्धकांची निवड पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी करण्यात आली होती. या स्पर्धेच्या प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक या गटात राज्यभरातून १८० स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. यात गणेश नाईक यांच्या ‘वाचू आनंदे’ या नवोपक्रमाचा आठवा क्रमांक आला. या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात पहिल्या दहा क्रमांकांचा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.

या नवोपक्रमासाठी गणेश नाईक यांना डॉ. लवू आचरेकर आणि सुनील करडे यांचे मार्गदर्शन लाभले. गणेश नाईक यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य कांबळे यांनी अभिनंदन केले आहे.