सिंधुदुर्ग - रत्नागिरी लोकसभेचा सस्पेन्स कायम !

Edited by: भरत केसरकर
Published on: March 13, 2024 14:48 PM
views 685  views

सिंधुदुर्ग : भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील एकूण 48 जागापैकी 20 जागा ज्या ठिकाणी मागच्या वेळी त्यांचे विद्यमान खासदार विजय झालेले होते त्यां जागावर दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपने पाच विद्यमान आमदारांचे तिकीट कापले आहे. मात्र बहुचर्चित सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावर अद्याप पर्यंत घोषणा झालेली नाही आहे. यामुळे या जागेवर सस्पेन्स कायम आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाचे किरण उर्फ भैय्या सामंत यांना उमेदवारी मिळते? की भाजप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देते ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे

        भाजपने आज आपली लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी दुसरी यादी जाहीर केली.या महाराष्ट्रातील भाजपच्या वीस विद्यमान खासदाराच्या जागेवर हे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. या 20 जागापैकी पाच जागांवर भारतीय जनता पार्टीने विद्यमान पाच खासदारांचे तिकीट कापले आहे. त्यामुळे हा एक प्रकारचा विद्यमान खासदारांना धक्का मानला जात आहे.संपूर्ण कोकणवासीयांचे लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी जागेवर भारतीय जनता पार्टी उमेदवार जाहीर करील अशी आशा वाटत होती. या ठिकाणी विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे नाव बहुचर्चेत आहे. याशिवाय शिवसेना शिंदे गटाकडून किरण उर्फ भैय्या सामंत यांचे नाव चर्चेत आहे. किरण सामंत यांनी यासंदर्भात प्रचाराला पण सुरुवात केली आहे. परंतु वेगवेगळ्या एक्झिट पोल नुसार या जागेचा सस्पेन्स कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपचा उमेदवार या जागेवर लढणार असे गोव्याचे मुख्यमंत्री यांनी सावंतवाडीतील भाजपच्या मेळाव्यात स्पष्ट केले होते. तर शिवसेनेकडून येथे शिवसेनेचाच उमेदवार असेल आणि किरण सामंत या ठिकाणी लढतील असे स्पष्ट केल्यानंतर निश्चितच शिवसेनेच्या शिंदे गटाकडून किरण सामंतानी आपला प्रचार सुरू केला होता. रत्नागिरी पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जात त्यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे. तर कार्यकर्त्यांसाठी रत्नागिरीहून खास प्रचारासाठी विशेष गाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या गाड्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे किरण सामंत लढणार हे शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

मात्र ही जागा कोणाला जाणार? याबाबत सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. यामुळे भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांची धाकधूक वाढलेली पाहायला मिळत आहे.