क्रीडा अधिकाऱ्यांचं निलंबन करा ; कब्बडी असोसिएशनची मागणी

Edited by: विनायक गावस
Published on: July 31, 2023 19:05 PM
views 77  views

सावंतवाडी : धर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांनी वसंत उर्फ अण्णा केसरकर यांच्या याचिकेनुसार कबड्डी फेडरेशनची मान्यता २०१६ पासून काढून घेतलेली असल्याने सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्याची कबड्डी अधांतरी आहे. क्रिडा आयुक्त सिंधुदुर्ग यांनी देखील दोन वर्षापूर्वी कबड्डी खेळाच्या आयोजनाबाबतच्या कबड्डी फेडरेशनच्या सर्व अधिकारांवर बंदी घातलेली आहे. तसेच शिक्षणाधिकारी, माध्यमिक यांनी देखील दोन वर्षापूर्वी फेडरेशनद्वारे कोणतेही शासकिय सामने आयोजित होता नये यासाठी बंदी घातलेली आहे. तरीदेखील आजपर्यंत बेकायदेशीररित्या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी फेडरेशनद्वारा सामन्यांचे आयोजने केल जात आहेत. या बेकादेशीर आयोजनांना अर्थातच क्रिडा अधिकारी, सिंधुदुर्ग हेच जबाबदार आहेत. आजच्या तारीखला शालेय क्रिडा स्पर्धाचे आयोजन देखील अधांतरीच आहे. अशा परिस्थितीत आज देखील कबड्डी फेडरेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य उजळ माथ्याने फिरत आहेत अस मत सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशननं पत्रकार परिषदेत व्यक्त केल.

तर या क्रीडा अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली. अन्यथा येत्या १५ ऑगस्टला क्रिडा उपसंचालक कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्ष दत्तप्रसाद अरविंदेकर, उपाध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर, चेअरमन अर्चना घारे-परब, विकास केरकर, महेश कांडरकर, जावेद शेख, जितेंद्र म्हापसेकर आदि उपस्थित होते.