राणेंच्या बालेकिल्ल्यात धडाडणार सुषमा अंधारे यांची तोफ

Edited by: उमेश बुचडे
Published on: November 17, 2022 19:44 PM
views 324  views

कणकवली : शिंदे गटाचा व विरोधकांचा समाचार घेण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा २१ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता कणकवलीत येणार आहे. सुषमा अंधारे यावेळी चोख उत्तर देण्यासाठी त्याची कॉर्नर सभा होईल अशी माहिती जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दिली.तर कणकवली खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याची माहिती जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली.कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते अतुल रावराणे, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले,महिला आघाडी प्रमुख नीलम पालव -सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राजू राठोड, कन्हैया पारकर, सिद्धेश राणे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

संजय पडते म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे विचार माडण्यासाठी व संविधानाच्या रक्षणासाठी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे या काम करत आहेत.विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याचे काम त्या करीत आहेत.त्यामुळे महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून कणकवली ते २१ नोव्हेंबरला त्या विरोधकांचा समाचार घेतील,असे संजय पडते यांनी सांगितले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लढणार आहे. तसेच जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडी करून निवडणुका लढण्याचा निर्णय शिवसेना खासदार विनायक राऊत ,आमदार वैभव नाईक घेतील .कणकवली खरेदी विक्री संघामध्ये आम्ही १५ जागांवर सतरा उमेदवार उभे केले आहेत. उद्या त्या उमेदवारांबाबत छाननी होईल त्यानंतर अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे सतीश सावंत यांनी सांगितले. सातरल कासरल येथे घेतलेला भाजपा प्रवेश म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार आहे. ते लोक आमच्या सोबत नव्हते.जुन्या लोकांचा प्रवेश घेणं हा त्याचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा टोला सतीश सावंत यांनी लगावला.

शिवसेना नेते अतुल रावराणे म्हणाले,राज्यात सविधानाची पायमल्ली होत आहे.राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप करण्यात आलेत,ते अतिशय लोकशाहीला घातक चित्र आहे.५० टक्के आरक्षण महिलांना देण्यात आले आहे.सघर्षातून ते नेतृत्व उभे राहत आहे.सत्तेचा गैरवापर केला जात आहेत.महाविकास आघाडीचे ते नेते आहेत.शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक ही बेकायदेशररित्या होती.हे न्यायालयाने सांगितले आहे.राज्यात लोकशाहीला घातक असे काम सत्ताधारी करीत आहेत. भारत जोडो यात्रा थांबण्यासाठी हालचाली सरकार करत आहेत.ही दडपशाही देशात आणि राज्यात आहे.त्यामुळे जनतेचा उद्रेक फार मोठ्या प्रमाणात आहे.नागरिकांनी सर्वसामान्य जनतेला माहिती नाही,उद्या आपल्या विरोधात कोणता गुन्हा दाखल होईल? असा टोलाही त्यांनी लगावला.