
वैभववाडी : शिवसेना संपली अशी अनेकांना वाटत असलं तरी खरे शिवसैनिक पक्षाशी एकनिष्ठ आहेत. नेते पक्ष सोडून गेले मात्र कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहीले आहेत असे मत युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी व्यक्त केले. वैभववाडीत आज ठाकरे शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते पार पडले.यावेळी शिवसेना उपनेते बाळ माने, जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दूधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
नाईक म्हणाले, शिवसेना पक्षातून अनेक जण बाहेर पडले.त्यावेळी काहीजण बोलत होते की वैभववाडीतील शिवसेना संपली परंतु आज जमलेल्या या गर्दीने पुन्हा दाखवून दिले की तळागळातील शिवसैनिक कार्यकर्ता अजून ठाम आहे. काही बोल बच्चन पदाधिकारी, सरपंच जरी गेले असतील तरी शिवसेनेचा खरा कार्यकर्ता हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहे.जे पक्ष सोडून गेले त्यांनी दुसऱ्या पक्षात जाऊन काय मिळवले व त्यांची आजची परिस्थिती काय आहे याच त्यांनी आत्मपरीक्षण करावं. तालुक्यातील सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी शिवसेना कार्यरत राहणार आहे. तालुक्यातील अनेक प्रश्नांबाबत ठाकरे शिवसेना नेहमीच आवाज उठवत असते.भविष्यातही हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.
ते पुढे म्हणाले, राज्यात मतचोरी झाली तशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातही झाली. कणकवली विधानसभेतही हा प्रकार झाला असल्याचा आरोप केला. पालकमंत्री व खासदार यांचं जनतेच्या विकासापेक्षा स्वतः च्या विकासाकडेच लक्ष अधिक आहे असा टोलाही त्यांनी लगावला