
देवगड : कोंडवाड्यात झालेल्या गाईच्या मृत्यू प्रकरणी नामदार नितेश राणे यांच्याकडून अशा कोणत्याही प्रकारासाठी कोणत्याही व्यक्तीची पाठराखण होणार नाही. वास्तविक नामदार नितेश राणे यांची प्रतिमा हिंदुत्व धर्मरक्षक, गोवंश रक्षक अशी आहे. यामुळे त्यांच्याकडून अशा कोणत्याही प्रकारासाठी कोणत्याही व्यक्तीची पाठराखण होणार नाही.असे मत देवगड शहर भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष दयानंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी या पत्रकार परिषदेसाठी तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, सरचिटणीस योगेश चांदोसकर, देवगड जामसंडे नगरपंचायतीचे गटनेते शरद ठुकरुल, सभापती आद्या गुमास्ते, नरेश डांबरी, राहुल सारंग, वैभव करंगुटकर व अन्य उपस्थित होते.
यावेळी ते पुढे म्हणाले कणकवलीचे शोबाज नेते उबाठाचे सुशांत नाईक त्यांना कणकवलीत काडीची किंमत नाही म्हणून ते देवगड मध्ये येऊन पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्यावर टीका करतात. देवगड मध्ये झालेल्या गाईच्या मृत्यूचे भांडवल करून ते नामदार नितेश राणे यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी ताबडतोब या घटनेची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या प्रशासनाला पालकमंत्री म्हणून दिले आहेत. त्या प्रकारे तिघांना याबाबत शोकॉज नोटिसा काढण्यात आल्या असून यथावकाश सर्वांवरच कारवाई होणार आहे. पालकमंत्री यांचा या विषयात लक्ष नाही ही बाब अत्यंत खोटी आहे. हा प्रकार घडल्यावर आम्ही जबाबदार सर्व पदाधिकारी तेथे लगेच पोहोचलो होतो. यामुळे पालकमंत्री यांच्या कार्यकर्तृत्वाला व त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेला सुशांत नाईक यांच्या कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही. उलट गोवंश हत्या बंदीला विरोध करणाऱ्यांच्या बरोबर उबाठाचे सुशांत नाईक बसतात हे लक्षात घेतले पाहिजे. यामुळे सुशांत नाईक यांनी आपल्या कक्षेत राहूनच, टीका करावी, असे मत भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दया पाटील व्यक्त केले आहे.