PM सूर्यघर मोफत वीज योजनेचे सर्वेक्षणाचं काम पोस्ट विभागाकडे !

Edited by: देवयानी वरसकर
Published on: March 06, 2024 15:37 PM
views 332  views

सिंधुदुर्गनगरी :  भारताचे पंतप्रधान यांनी नुकतेच “पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेची” घोषणा केली आहे. या योजनेसाठी सर्वेक्षणाचे काम भारतीय डाक विभागाकडे देण्यात आले असुन, या योजनेमध्ये मोफत नावनोंदणीसाठी जिल्ह्यातील सर्व पोस्टमन व ग्रामीण डाक सेवक सज्ज आहेत.  

        पीएम सूर्यघर अॅपवर पोस्टमनमार्फत याची नाव नोंदणी केली जाणार असुन, सौर उर्जेचे संयत्र बसविण्यासाठी केंद्र सरकार मार्फत अनुदान देखील दिले जाणार आहे. केंद्र सरकारने “पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेची” या महत्वकांक्षी योजनेची घोषणा केली असुन या योजनेच्या माहितीचा जनजागर करीत सर्वेक्षणाची महत्वपूर्ण जबाबदारी भारतीय टपाल खात्याकडे अर्थात पोस्ट खात्याकडे सोपविली आहे. सर्वेक्षणासाठी पीएम सूर्यघर अॅप विकसित करण्यात आले आहे. याच अॅपवर घरोघरी जाऊन पोस्टमन व ग्रामीण डाक सेवक ऑनलाईन सर्वेक्षणाचे काम करत आहेत. देशभरात 1 कोटी घरांमध्ये पीएम सूर्यघर योजना पोचविण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारकडून निश्चित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 300 युनिट्स पर्यंत मोफत वीजेचा लाभ मिळणार असुन सबसिडी स्वरूपात सोलार पॅनल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 

सयंत्राद्वारे तयार होणाऱ्या सौर उर्जेची वापर करून विजेची गरज पूर्ण करायची असा या योजनेचा मुख्य हेतू आहे. घरावरील संयात्रातून वीज उपलब्ध झाल्याने विजेचा खर्च वाचणार असुन अतिरिक्त निर्माण होणारी वीज महावितरणला विकत देखील देता येणार आहे. सर्वेक्षणासाठी कुटुंबाच्या विज वापरासह इतर माहिती संकलित केली जाणार आहे. 

मा. पंतप्रधानांच्या या महत्वकांक्षी योजनेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोस्टमन व ग्रामीण डाक सेवक सज्ज झाले असुन आता पर्यंत संपूर्ण जिल्ह्यातून 1474 कुटुंबांचे सर्वेक्षण करून त्यांची या योजनेसाठी नाव नोंदणी करण्यात आली आहे. या विषयी अधिक माहिती देतांना सिंधदुर्ग डाक विभागाचे अधिक्षक श्री. मयुरेश कोले यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या सर्वेक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले असुन जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतींना गावातील सर्व इच्छुक नागरिकांची माहिती नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये तातडीने देऊन भारत सरकारची ही महत्वकांक्षी योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्याच्या देशकार्यात सहकार्य करण्याची विनंती केली आहे.