
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग लाभार्थींना स्वयंरोजगारासाठी व इतर कारणांसाठी विविध लाभ दिले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या व्यक्तींची माहिती तात्काळ संकलित करण्याचे आदेश सर्व पंचायत समिती यांना रवींद्र खेबुडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी दिलेले आहेत. ही कार्यवाही दोन दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
ज्या व्यक्ती 40% पेक्षा अधिक दिव्यांग आहेत अशा व्यक्तींनी आपली माहिती त्रिस्तरीय समितीच्या दिव्यांग दाखल्यासह संबंधित ग्रामपंचायतीमध्ये देण्याची आहे. याबरोबरच यापूर्वी त्यांनी घेतलेला लाभ व आता स्वयंरोजगार करावयाचा असल्यास किंवा इतर कारणांसाठी कोणकोणत्या लाभाची गरज आहे याबाबतची माहिती त्यांनी ग्रामपंचायत मध्ये तात्काळ देण्याची आहे. या सर्वेक्षणामधून कोणीही दिव्यांग व्यक्ती वंचित राहू नये याबाबत आवश्यक ती काळजी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
संबंधित दिव्यांग लाभार्थ्यांनी आपली नोंदणी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये करून जास्तीत जास्त सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळकृष्ण परब यांनी केले आहे.