
सावंतवाडी : राज्यातील महायुती सरकारने धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत आश्वासित केले असल्यामुळे या निवडणुकीत भाजपा शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट व आरपीआय आठवले व मित्र पक्षांच्या महायुतीला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. याबाबतचे पत्र यशवंत सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सिताराम जानकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
धनगर व धनगड या शब्दांतील फरकामुळे आज पर्यंत धनगर समाजाला आरक्षण देण्यात अडचणी येत आहेत. काही जणांनी धनगड अशी खोटी सर्टिफिकेट मिळवून धनगड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असल्याचे भासवून धनगर समाजाच्या हक्काच्या आरक्षणावर गदा आणली होती. मात्र महायुती सरकारने संभाजीनगर येथील धनगड सर्टिफिकेटची चौकशी लावून व ती रद्द करून धनगर व धनगड हे एकच असल्याचे प्रतिज्ञापत्र मा. न्यायालयाला दिले असल्यामुळे महायुती सरकार हे धनगर समाजाच्या बाजूने आहे सिद्ध झाले आहे. त्यामुळे धनगर समाजाला एस टी आरक्षण मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
याचसाठी शिवसेना व महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा येणे आवश्यक असल्यामुळे आमच्या राज्य संघटनेने महायुतीला पूर्णपणे पाठिंबा जाहीर केला आहे. याच महायुती सरकारमधील एक अभ्यासू व संयमी व्यक्तिमत्त्व असलेले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे सावंतवाडी विधानसभेची निवडणूक लढवत असून त्यांना देखील यशवंत सेनेने आपला पाठिंबा जाहीर केला असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिताराम जानकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्राद्वारे जाहीर केले आहे.