LIVE UPDATES

मराठा ॲकॅडमीच्यावतीने औदुंबर स्वामी मंदिर बांधकामासाठी सहकार्य

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 25, 2026 18:23 PM
views 27  views

सावंतवाडी : येथील श्री औदुंबर स्वामी मंदिराच्या बांधकामाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या पवित्र आणि सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलत सावंतवाडीच्या मराठा ॲकॅडमीच्यावतीने मंदिर बांधकामासाठी मोलाचे सहकार्य करण्यात आले. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून सैन्य दल आणि पोलीस दलात भरती होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या या उमेदवारांनी आपल्या शिस्तीचा आणि सामाजिक बांधिलकीचा उत्तम परिचय या निमित्ताने दिला आहे.

एक आदर्श सैनिक किंवा पोलीस अधिकारी होण्यासाठी शारीरिक क्षमतेसोबतच समाजसेवा, सहकार्य आणि शिस्त किती महत्त्वाची असते, हेच या तरुणांनी आपल्या योगदानातून दाखवून दिले. मंदिर बांधकामास हातभार लावण्यासोबतच, अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मंदिर परिसरात एकत्र येत स्वच्छता आणि इतर कामांसाठी मोठे श्रमदानही केले.

या भावी रक्षकांच्या कौतुकास्पद उपक्रमाची आणि सहकार्याची दखल घेत सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी मराठा अकॅडमीचे संचालक बापू परब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. वर्दीची शिस्त आणि समाजाप्रती असलेली कर्तव्याची भावना या विद्यार्थ्यांनी उत्तम रीतीने जपल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. या उपक्रमासाठी मराठा अकॅडमीचे उमेदवार सिद्धेश सावंत, उमेश पालव, राजेश पालव, ओंकार गावडे, प्रफुल्ल सावंत यांच्यासह शिक्षक आनंद राणे आणि इतर सर्व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरुणांच्या या शिस्तबद्ध, सेवाभावी आणि सहकार्याच्या वृत्तीमुळे संपूर्ण परिसरातून त्यांचे जोरदार कौतुक होत आहे.