
देवगड : देवगड तालुक्यातील चाफेड गावचे विद्यमान सरपंच किरण लिलाधर मेस्त्री (४० रा. चाफेड पिंपळवाडी) यांनी बुधवारी दुपारी २.३० वा. च्या पुर्वी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. मनमिळावू स्वभाव असलेल्या किरण मेस्त्री यांच्या निधनाने चाफेड गावात हळहळ व्यक्त होत आहे.
किरण मेस्त्री हे गेल्या अडिच वर्षापासून चाफेड गावचे लोकनियुक्त सरपंच म्हणून कार्यरत होते. भाजपचे ते कार्यकर्ते होते. त्यांचा वडिलोपार्जित गणेश मुर्तीकामाचा व्यवसाय असून ते मुर्तीकार होते. त्याशिवाय ते छोटी- मोठी बांधकाम संबंधी कामेही करत असत. बुधवारी दुपारी २.३० वा. च्या सुमारास ते गळफास लावलेल्या स्थितीत घरात आढळून आले. त्यांना तातडीने कणकवली उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले होते. मात्र तत्पुर्वीच त्यांचे निधन झाले होते.
त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, बहिण असा परिवार आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून त्यांची नोंद करण्यात आली आहे. ही घटना कणकवली पोलिस ठाण्यात झिरो नंबरने दाखल करून अधिक तपासासाठी देवगड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.