
वैभववाडी : कोळपे बौद्धवाडी येथील रुपेश गौतम जाधव (वय ४०) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज (ता.४) दुपारी ४वाजण्याच्या सुमारास घडला. मात्र आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
कोळपे येथील बौद्धवाडीत रुपेश जाधव यांचं घर आहे. त्याची आई मुंबई येथे राहत असून, तो या घरात एकटाच राहत होता. आज सायंकाळी ४वाजण्याच्या दरम्यान त्याने राहत्या घरी लाकडी बाराला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून जीवन संपवले. रुपेश हा दिवसभर घराबाहेर दिसला नसल्याने, शेजारी राहणारे त्याची चौकशी करायला गेले असता, तो गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. त्यांनी याबाबत पोलीस पाटील यांना माहीती दिली.
पोलीस पाटील यांनी या घटनेची माहिती पोलीसात दिली. पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. रविवारी शवविच्छेदन करून मृतदेह आईच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्याच्या पश्चात आई व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.










