चोरटा गजाआड ; आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 20, 2023 19:12 PM
views 548  views

वैभववाडी : शहरातील अकिंत मेडिकलमधील चोरी प्रकरणी संशयित आरोपी राजाराम विष्णू हवालदार (वय-३८) मुळ रा.बेळगाव याला आज सकाळी पोलीसांनी वैभववाडी येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. पोलीस स्टेशनला चौकशीसाठी आणले असता त्याने सॅनिटायझर प्राशन केले. त्यामुळे त्याला तातडीने उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान संशयिताकडे चोरीतील मुद्देमाल मिळाला आहे.त्याच्यावर चोरीसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील संभाजी चौकासमोर असलेले अकिंत मेडिकल फोडुन अज्ञात चोरट्यानी सोमवारी रात्री रोख रक्कम आणि तीन संगणक स्क्रीन चोरले. या प्रकरणाचा तपास पोलीसांनी सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातुन सुरू केला होता. संशयित सीसीटिव्हीत  कैद झाला होता. त्यासंदर्भातील  एक व्हीडोओ आणि फोटो  पोलीसांनी व्हायरल केले होते. त्यानुसार शहरात एका ठिकाणी तशा वर्णनाची व्यक्ती असल्याची माहीती पोलीसांना मिळाली होती. पोलीसांनी काल सायकांळी मुळ बेळगाव सध्या रा.वैभववाडी येथील राजाराम हवालदार याला ताब्यात घेतले. ज्यावेळी ताब्यात घेतले त्यावेळी दारूच्या नशेत होता. त्यामुळे पोलीसांना त्याच्याकडुन माहीती घेणे शक्य झाले नाही. परंतु आज सकाळी त्याच्याकडुन चोरलेली रक्कम आणि संगणक स्क्रीन आढळुन आली. त्याला चौकशीसाठी आज सकाळी पोलीस स्थानकात आणले होते.

दरम्यान तेथे संशयिताने सॅनिटायझर प्राशन केले. त्यामुळे त्यांची  प्रकृती बिघडली, त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती सुधारत असल्याचे पोलीसांकडुन सांगण्यात आले. या प्रकारानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.आढाव यांनी दुपारी वैभववाडी पोलीस स्थानकाला भेट दिली. त्यांनी चोरीच्या तपासाचा आढावा घेतला.संशियाताची तब्येत सुधारल्यांनंतर चोरी प्रकरणातील तपासाला गती मिळेल. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल पाटील हे करीत आहेत.